सोमवारपासून शाळा सुरू होणार मात्र, पालकांमध्ये अनुत्सुकता

Akola News: School will start, but parents are reluctant
Akola News: School will start, but parents are reluctant

शिरपूर जैन (जि.वाशीम)  ः येत्या २३ नोव्हेंबरपासून शाळेची घंटा वाजणार, असे शासनाकडून निश्चित केले गेले. त्यासाठी शाळांना सर्व तयारी करण्याचे आदेश देण्यात आलेत. शिक्षण विभागाच्या आदेशाने शाळा देखील तयारीला लागल्या आहेत. मात्र, आपल्या पाल्याला शाळेत पाठवायच कसे? असा प्रश्न अनेक पालक उपस्थित करीत आहेत. त्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकात मोठी अनुत्सुकता दिसून येत आहे.

घाई गडबडीत मार्च पासूनच शाळांना सुट्टी देण्यात आली. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता परीक्षाही अर्धवट घेण्यात आल्यात किंवा परीक्षेविनाच विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात आले. अजूनपर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत.

कोरोना बधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी, अद्यापही कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. त्यांच्यात सोशल डिस्टंसिंग ठेवणे कठीण आहे. विद्यार्थी एकमेकांपासून दूर राहूच शकत नाही तर, एका बाकड्यावर एक विद्यार्थी असल्यास शाळेची इमारतही कमी पडेल. अशा अडचणी असूनही शासनाद्वारे शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत.

त्यानुसार शिक्षण विभागाने नियम व अटी निश्चित करीत तसे शाळांना आदेशही दिलेत. थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर याच्या व्यवस्थेसह प्रत्येक विद्यार्थ्याकडे मास्क या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक शिक्षकांची सध्या कोरोना तपासणी केली जात आहे. तपासणी करण्यासाठी सुद्धा शिक्षकांची मोठी गर्दी होत आहे.

विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासात लक्ष देत नाहीत हेही तेवढेच खरे तर, अती मोबाईल वापरामुळे त्यांच्या आरोग्यावर धोकाही संभवतो. या सर्व बाबी असल्या तरी शाळा सुरू झाल्यानंतर आजूबाजूच्या खेडेगावातील विद्यार्थी देखील शाळेत येणार, पुन्हा शाळेत गर्दी होणार. मात्र, या गर्दीत एखादा विद्यार्थी अथवा शिक्षक बाधित असल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. याचा विचार ही होणे गरजेचे आहे.

विद्यार्थी हे कोरोना संसर्ग वहन करण्यास फार मोठे साधन ठरू शकतात. कारण शाळेत एकत्र येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समुहातून असा घात होऊ शकतो. एखादी थोडी चूकही मोठी महाग पडू शकते. गत नऊ महिन्यापासून मनामनात कोरोनाची भीती बसली असून, दिल्लीसारख्या ठिकाणी परत कोरोनाची लाट सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातही कोरोनाची पुन्हा लाट येऊ शकते, असे म्हटले जाते. निश्चितच शाळा सुरू झाल्यानंतर ही महामारीची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला असून, शिक्षणविभाग कामाला लागला आहे. येत्या २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार.

मात्र, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता व बालकांच्या आरोग्याचा विचार करता आपला पाल्य शाळेत पाठवायचा की नाही? हा निर्णय पालकांचा आहे. त्याबाबत पालक वर्ग मोठ्या प्रमाणात अनुत्सुक असल्याचे दिसून येते. कोरोना संसर्गामुळे निश्चीतच २०२०-२१ हे शैक्षणिक सत्र वाया जाणार हे नक्की. अनेक पालकांच्या मते शाळेआधी पाल्याचे आरोग्य महत्त्वाचे आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com