esakal | राष्ट्रीय महामार्गावर लुटारूंची शोधा शोध
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Search for robbers on national highways continues

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नवसाळ फाट्याजवळ सोमवारी (ता.७) पहाटे पावणेतीनच्या दरम्यान उभ्या नादुरूस्त पीकअप व्हॕनच्या चालकाला मारहाण करून लुटमार करणारे टोळके अद्याप पोलिसांना गवसले नाही.

राष्ट्रीय महामार्गावर लुटारूंची शोधा शोध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नवसाळ फाट्याजवळ सोमवारी (ता.७) पहाटे पावणेतीनच्या दरम्यान उभ्या नादुरूस्त पीकअप व्हॕनच्या चालकाला मारहाण करून लुटमार करणारे टोळके अद्याप पोलिसांना गवसले नाही.


बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अब्दुल शफीक अब्दुल हमीद (वय २८) व मोहम्मद एजाज मोहम्मद जियाउद्दीन (वय ३०) हे दोघे जबलपूर येथून वटाणा खरेदी करून खामगाव येथे विक्री करण्यासाठी आणायला जात असताना माना पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गावरील नवसाळ फाट्याजवळ त्यांची मालवाहू पीक व्हॕन पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला लावून ते चाक बदलवीत होते.

दरम्यान, चार जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला करून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत मोहम्मद ईजाज याच्या उजव्या हाताला दुखापत झाली.

घाबरलेल्या पीकअप गाडीतील दोघांनी त्यांच्या जवळील ४ हजार ५०० रुपये किंमतीचे दोन मोबाईल तसेच नगदी ३५ हजार रुपये असे एकूण ३९ हजार ५०० रुपये लुटारुंच्या टोळक्याच्या स्वाधीन करून सुटका करून घेतली.

गाडी चालक व सोबत्याने जीव वाचविण्यासाठी लगतच्या शेर ए बिहार या धाब्यावर जाऊन आसरा घेतला. साडेतीनच्या दरम्यान गस्तीवर असलेले माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे तिथे पोहचले असता त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगण्यात आल्यावरून त्यांनी त्वरित आजूबाजूचे धाबे तपासणी करून या प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला,

मात्र त्यांचा सुगावा लागला नाही. प्रभारी उपविभागीय अधिकारी सुनील सोळंके तसेच स्थानीक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी भेट दिली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image