
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १ डिसेंबर) रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा हजार ४८० शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १ डिसेंबर) रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा हजार ४८० शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सकाळी ८ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यानंतर ३ डिसेंबररोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदानाच्या पूर्वी म्हणजेच शनिवारी (ता. २९) प्रत्यक्ष प्रचार थांबला असून आता छुप्या मार्गाने प्रचार करण्यात येत आहे. असे असले तरी निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक असल्याने यावेळी शिक्षक मतदार कोणाला पसंती देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर निवडणुकीची अधिसूचना ५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. सदर कालावधीत एकूण २८ नामनिर्देशन पत्रे सादर करण्यात आली. १३ नोव्हेंबररोजी छाननी प्रक्रिया पार पडली व सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरली. १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने आता २७ उमेदवार निवडणूक रिंगणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे दोन उमेदवार, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे दोन आणि समर्थित व शिक्षक संघटनेच्या २३ उमेदवारांचा समावेश आहे. मतदारांना निवडणुकीचा हक्क बजावताना प्राधान्य क्रमानुसार उमेदवाराची निवड करावी लागेल.
जिल्ह्यात १२ मतदान केंद्र
निवडणुकीसाठी जिल्ह्यात १२ मतदान केंद्र असणार आहे. त्यात अकोट तालुक्यात तहसिल कार्यालय अकोट, तेल्हारा तालुक्यात संजय गांधी विभाग गाडेगाव रोड जुने तहसिल कार्यालय तेल्हारा, बाळापूर तालुक्यात पंचायत समिती सभागृह बाळापूर, अकोला ग्रामीणसाठी जि.प. आगरकर कनिष्ठ विद्यालय खोली क्र. २ अकोला, जि.प. आगरकर कनिष्ठ विद्यालय खोली क्र. ३ अकोला, अकोला शहरासाठी राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय खोली क्र. १ मूर्तिजापूर रोड अकोला, राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय खोली क्र. २ मूर्तिजापूर रोड अकोला, राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय खोली क्र. ३ मूर्तिजापूर रोड अकोला, जिल्हा परिषद आगरकर कनिष्ठ विद्यालय खोली क्र. १ अकोला. पातूर तालुक्यात संजय गांधी विभाग तहसिल कार्यालय पातूर, बार्शीटाकळी तालुक्यात पंचायत समिती सभागृह बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात संजय गांधी विभाग तहसिल कार्यालय मूर्तिजापूर येथे मतदान प्रक्रिया पार पडेल.
जिल्ह्यात अशी आहे मतदारांची संख्या
पुरष मतदार - ४३०५
महिला - २१७५
एकूण - ६४८०
(संपादन - विवेक मेतकर)