आचारसंहिता संपताच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 2 December 2020

 अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने सध्या अकोला जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. परंतु ३ डिसेंबररोजी मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

अकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने सध्या अकोला जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. परंतु ३ डिसेंबररोजी मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

त्यामुळे जिल्हा परिषदेची रखडलेली सर्वसाधारण सभा घेण्यात येईल. त्यासाठी सत्ताधारी वंचितचे पदाधिकारी व सदस्यांसह प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे.

आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम चारच महिने शिल्लक राहिल्याने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे मार्गी लावण्याचे आव्हान सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी आणि प्रशासनासमोर आहे. त्यातच जिल्हा परिषदेत गत काही दिवसांपासून कुरघोडीचे राजकारण सुरू असल्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये खटके उडत आहेत.

सत्ताधाऱ्यांकडून मंजुर करण्यात आलेल्या ठरावांवर स्थगिती आणण्याचे काम विरोधकांनी केल्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमधील दूरी वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता असल्याने सभेत आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेण्यावर मर्यादा आहेत. परंतु ३ डिसेंबररोजी मतदान झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर सर्वसाधारण सभेत आर्थिक व धोरणात्मक निर्णय सत्ताधाऱ्यांना घेता येतील. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह प्रशासन सर्वसाधारण सभेच्या तयारीत लागले आहे.

विषय पत्रिकेवर राहणार हे विषय
जिल्हा परिषदेच्या १४ सप्टेंबर राेजी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांचा समावेश हाेता. यात भांबेरी येथे प्राथमिक आराेग्य केंद्र स्थापन करणे, कान्हेेरी सरप येथी ग्रामपंचायत इमारत पाडणे, स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदस्तरीय जैविक विविधता व्यवस्थापन समिती पुर्नगठण- स्थापन करणे, समाज कल्याण विभागातर्फे दुधाळ जनावरांच्या वितरणाला तांत्रिक मंजुरी देणे आदींचा समावेश हाेता. मात्र नंतर हे ठराव विभागीय आयुक्तांनी विराेधकांच्या याचिकेवरुन फेटाळले हाेते. त्यामुळे आता येणाऱ्यासभेत या विषयांसह विराेधकांकडूनही काही ठराव मांडले जाण्याची शक्यता आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: As soon as the code of conduct ends, the general meeting of the Zilla Parishad, the administration with the ruling party starts preparations