क्रीडासंकूल गायब, खेळायचे आहे तर जा शेतात!

अरविंद गाभणे
Thursday, 1 October 2020

तालुका क्रीडा संकुलाचे काम रखंडल्याने युवकांच्या शारीरिक विकासाला आणि क्रीडात्मक प्रगतीला खिळ बसली आहे. क्रीडांगणाअभावी तालुक्यातील तरुणांना व्यायामासाठी शेतात जाण्याची वेळ आली आहे.

मालेगाव (जि.वाशीम) :  तालुका क्रीडा संकुलाचे काम रखंडल्याने युवकांच्या शारीरिक विकासाला आणि क्रीडात्मक प्रगतीला खिळ बसली आहे. क्रीडांगणाअभावी तालुक्यातील तरुणांना व्यायामासाठी शेतात जाण्याची वेळ आली आहे.

एकीकडे पोलिस भरतीचा सराव मुले करत आहेत तर, काही हेल्थ काँशिअस लोक दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालणे, पळणे आदी व्यायाम करत आहेत. दुसरीकडे कुठेच तालुक्यातील शाळांना पुरेसे खेळाचे मैदान नाही. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक विकासासोबत आवश्यक शारीरिक विकास होत नाही.

मानसिक विकास खुंटून, युवा पिढी रोगराईला बळी पडत आहे. तीन वर्षांपूर्वी शासकिय क्रीडा संकुल निर्मितीसंदर्भात प्रशासनाकडून याकरिता प्रयत्न केल्या गेले मात्र, सध्या क्रीडासंकुलाला कुंपण भिंत तयार झालेली आहे. एक-दोन क्रीडांगण तयार झालेले आहेत. मात्र, त्या ठिकाणी गवत वाढले असून, तेथे रनिंग ट्रॅक यासह आदी अनेक बाबी अजूनही सुरू न झाल्याने तसेच त्याच्या आवारात अनेक ठिकाणी मोठे गवत सुद्धा वाढले आहे.

खेळाडूंतर्फे नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे क्रीडासंकुल धूळखात आहे. अद्यापही ते सुरू झाले नाही, त्यात गवत वाढले आहे. तालुक्यातील युवकांची गरज म्हणून काही लेआउटधारक त्यांच्या लेआउटमध्ये मुलांना सराव करू देतात.

तालुका क्रीडासंकुल कार्यान्वित झाले तर, मुलांना खेळाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला फायदा होईल तसेच अनेक लोक सकाळ-संध्याकाळ धावण्यासाठी किंवा चालण्यासाठी जाऊ शकतील. परंतु मालेगाव तालुक्यात ट्रॅक अस्तित्वात नसल्याने बाहेर कुठेतरी त्यांना आपला जीव हातात घेऊन रस्त्यावरच चालावे किंवा पळावे लागते. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्यास हा प्रश्न निकाली लागू शकतो.

तालुका तसेच जिल्हा प्रशासनाची उदासीनता आणि स्थानिक लोक प्रतिनिधींची अनास्था याचा संयुक्त परिणाम म्हणून हा तालुका विकासाबाबत सदैव मागासलेला असतो, तशी तालुक्यातील नागरिकांकडून नेहमीच ओरड होते. मात्र, याकडे सर्वांचेच दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज
सध्या सरकारी नोकरी मिळणे मुश्किल झाले आहे. युवकांना सैन्यभरती किंवा पोलिस भरतीशिवाय पर्याय नाही. यामध्ये त्यांना शारीरिक पात्रता मिळविण्यासाठी नियमित सराव करणे गरजेचे आहे. मात्र क्रिडासंकूल नसल्याने युवकांना त्रास सहन करावा लागतो. याची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Sports complex disappears, if you want to play, go to the field!