
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तर काही ठिकाणी कमी पाऊस. यंदा पातूर तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी अधिक आहे.
अकोला : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तर काही ठिकाणी कमी पाऊस. यंदा पातूर तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी अधिक आहे.
त्यामुळे पिकांचे नुकसानही मोठ्या क्षेत्रावर झाले. गेल्या आठवड्यात झालेल्या सलग पावसामुळे या तालुक्यात सोंगणी केलेल्या ज्वारीच्या कणसांमधून कोंब बाहेर आले असून रोप तयार होत आहेत. विवरा येथील रविंद्र शिरसाठ यांना ज्वारीच्या दोन एकरातील पिकापासून खायला दाणासुद्धा झालेला नाही.
विवरा परिसरात परतीच्या पावसाने मागील आठवड्यात सतत हजेरी दिली. शिरसाठ यांनी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात ज्वारीची सोंगणी केली होती. कणसे वाळल्यानंतर तातडीने त्यांची कापणी करून थ्रेशरच्या साह्याने ज्वारी काढून घेऊ असे त्यांचे नियोजन होते. मात्र, एकदा सुरू झालेला पाऊस आठ-दहा दिवस सातत्याने हजेरी देत होता. यामुळे जमिनीवर पडलेले ज्वारीचे पीक वाया गेले. ज्वारीला चांगले दर मिळत असल्याचे पाहून शिरसाठ यांनी दोन एकरात लागवड केली होती.
चांगले व्यवस्थापन केले. पाऊस समाधानकारक असल्याने पीक जोमदार होते. यामुळे ते चांगल्या उत्पादनाचे स्वप्न पाहत होते. पिकाचे एवढे नुकसान होईल, असे कधी स्वप्नातही पाहले नव्हते. सततच्या पावसामुळे ज्वारी आणि त्यापासून मिळणारा चारा, असा दोन्ही गोष्टी खराब झाल्या आहेत. प्रत्येक कणसाला कोंब फुटले. ज्वारी जमिनीवर पडलेली असल्याने पूर्ण खराब झाली आहे.
जून महिन्यात दोन एकरात लागवड केली. आतापर्यंत २० हजार रुपये खर्च लागला. हा परतीया पाऊस यायच्या आधीच सोंगणी केली होती. नंतर सतत पाऊस सुरू राहला. पूर्ण कणसातून कोंब आले आहेत. पिकाची आताची स्थिती पाहता काहीही उत्पादनाची चिन्हे नाहीत. शेतातील नुकसानाची अद्याप कुणीही पाहणी केली नाही.
-रविंद्र शिरसाठ, शेतकरी, विवरा, ता. पातूर, जि. अकोला.
(संपादन - विवेक मेतकर)