esakal | सावत्र आईने चटके दिल्याची होती चर्चा, शेकोटीने पाय भाजल्याची मुलाने दिली कबुली
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Stepmothers mother used to give clicks, son confesses to burning her feet by fire

आठ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना जवळा बाजार येथे घडल्याची चर्चा सोशल मीडियावर जोमात होती. दरम्यान, बोराखेडी पोलिसांनी रविवारी (ता.20) आर्यनची विचारपूस केली असता, शेकोटीमुळे अचानक पाय भाजल्याची कबुली त्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

सावत्र आईने चटके दिल्याची होती चर्चा, शेकोटीने पाय भाजल्याची मुलाने दिली कबुली

sakal_logo
By
शाहीद कुरेशी

मोताळा (जि.बुलडाणा)  : आठ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना जवळा बाजार येथे घडल्याची चर्चा सोशल मीडियावर जोमात होती. दरम्यान, बोराखेडी पोलिसांनी रविवारी (ता.20) आर्यनची विचारपूस केली असता, शेकोटीमुळे अचानक पाय भाजल्याची कबुली त्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.


नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथील आर्यन सचिन शिंगोटे (वय 8 वर्ष) हा चिमुकला लहान असताना, त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. मुलाचा सांभाळ करण्यासाठी वडील सचिन रामेश्वर शिंगोटे यांनी कालांतराने दुसरे लग्न केले. दुसर्‍या पत्नीपासून त्यांना एक मुलगा व एक मुलगी असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सावत्र आई शारदाने आर्यनचा छळ केल्याची पोस्ट दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जोमात फिरत होती. व्हायरल पोस्टमध्ये नमूद आहे की, सावत्र आई शारदाने चिमुकल्या आर्यनचे हातपाय पकडून त्याला गरम तव्यावर उभे करून चटके दिले. त्याने आरडाओरड करू नये म्हणून त्याचे तोंडही दाबून ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे आर्यनचे वडील सचिन शिंगोटे यांनी सदर प्रकार डोळ्यांनी बघून देखील मध्यस्थी केली नाही.

सदर धक्कादायक प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. त्यानंतर आर्यनला उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे, असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. दरम्यान, बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड, पीएसआय अनिल भुसारी व सहकार्‍यांनी या व्हायरल पोस्टची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी शनिवारी जवळा बाजार गावात धडक दिली. परंतु आर्यन हा अकोला येथे भरती असल्याचे समजले. त्यामुळे पोलिस पथक अकोल्याकडे रवाना झाले.

मात्र बाळापूरनजीक असताना त्यांना आर्यनची अकोला येथून सुटी झाल्याचे समजले. त्यामुळे पोलिस पथक माघारी फिरले. पोलिसांनी रविवारी (ता.20) सकाळी आर्यनच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली असता, चार-पाच दिवसांपूर्वी शेकोटीवर हातपाय शेकत असताना अचानक पाय भाजल्याची कबुली आर्यनने पोलिसांना दिली. वडील सचिन शिंगोटे यांनी आर्यनला गावातील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. त्यानंतर गुरुवारी (ता.17) त्याला खामगाव उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, आर्यनचे पोट फुगल्याने शुक्रवारी (ता. 18) त्याला अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दवाखान्यातून सुटी झाल्यावर शनिवारी (ता.19) सायंकाळी त्याला घरी परत आणल्याची माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. आई-वडिलांविरुद्ध कोणतीच तक्रार नसल्याचे आर्यनने पोलिसांना सांगितले, अशी माहिती बोराखेडी पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान, आर्यनचा योग्य उपचार करून काळजी घेण्याची सूचना पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे.


आर्यनची इन-कॅमेरा विचारपूस
बोराखेडी पोलिसांनी चिमुकल्या आर्यनची इन-कॅमेरा विचारपूस केली. यावेळी पोलिस निरीक्षक माधवराव गरुड, पीएसआय अनिल भुसारी, पोहेकाँ राजेश आगाशे, पोकाँ सुनील थोरात, चालक एएसआय शेख मुस्तकीम, महिला पोकाँ मोरे, महिला दक्षता समितीच्या अंजनाताई खुपराव, पोलिस पाटील श्री इंगळे यांची उपस्थिती होती. चिमुकला आर्यन लहान असल्याने पोलिसांनी वर्दी ऐवजी साधा ड्रेस परिधान केला होता.

 नागरिकांमध्ये तर्कवितर्क व कुजबूज सुरू
आर्यनचा सावत्र आईने छळ केल्याची पोस्ट सोशल मीडियावर जोमात फिरली. त्यामुळे सावत्र आईच्या निर्दयीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. परंतु पोलिस चौकशीत आर्यनने आईवडिलांना क्लिनचिट दिली आहे. मात्र परिसरातील नागरिकांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असून, कुजबूज सुरूच आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image