विद्यार्थ्यांना आता ५६ दिवसांचा पोषण आहार

सुगत खाडे  
Monday, 19 October 2020

कोरोनाच्या स्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचा निर्णय शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतच्या ५६ दिवसांच्या पोषण आहाराचे वाटप करण्यात येणार आहे.

अकोला  : कोरोनाच्या स्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचा निर्णय शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतच्या ५६ दिवसांच्या पोषण आहाराचे वाटप करण्यात येणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना शिजवलेल्या अन्नाचे वाटप न करता धान्याचे वाटप करण्यात येईल. सदर धान्य घरी शिजवून विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे सेवन करावे लागेल.

विदर्भात २६ जूनपासून शैक्षणिक सत्राला दरवर्षी सुरुवात होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा पूर्ण क्षमतेने केव्हा सुरू होतील, याचे निश्‍चित वेळापत्रक नाही. परंतु कोरोनामुक्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. म्हणजेच पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्याचे सध्या नियोजन नाही.

असे असले तरी या काळात विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत राहावा यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने विद्यार्थ्यांना जून ते ऑगस्ट या कालावधीतील ६० कार्यदिवसांकरीता पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. सदर पोषण आहार धान्यादी मालाच्या स्वरुपात (एकत्रीत) देण्यात आला. परंतु त्यानंतरच्या काळात मात्र पोषण आहाराचे वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले नव्हते. परिणामी पोषण आहार वाटपाला ‘ब्रेक’ लागला होता. दरम्यान आता शासनाने सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतच्या पोषण आहाराचे वाटप करण्यास मंजुरी दिली आहे.

असा मिळेल पोषण आहार
- इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना अन्न शिजवून देण्यासाठीच्या खर्चाच्या दरानुसार ५६ दिवसांसाठी प्रति विद्यार्थी २५० रुपये लागतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला याच रक्कमेच्या मर्यादेत (दरानुसार) डाळ व कडधान्य पोषण आहाराच्या स्वरुपात देण्यात येईल.
- इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अन्न शिजवून देण्यासाठीच्या खर्चाच्या दरानुसार ५६ दिवसांसाठी प्रति विद्यार्थी ३७५ रुपये लागतात. त्यामुळे या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला याच रक्कमेच्या मर्यादेत (दरानुसार) डाळ व कडधान्य देण्यात येईल.
- इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ५ किलो ६०० ग्राम तांदुळ आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरीता ८ किलो ४०० ग्राम या प्रमाणात तांदुळ देण्यात येईल.

डाळ, कडधान्य निश्चितीसाठी आज बैठक
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हास्तरावर गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक (शापोआ) व आहार तज्ज्ञ यांची एक बैठक आयोजित करुन माहे नोव्हेंबर अखेर विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेवून वाटप करायची डाळ व एक कडधान्य निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी (ता. १९) धान्य निश्चितीसाठी जिल्हा परिषदेत बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना तूर, मसुर किंवा मूग डाळ द्यावी यासह हरभरा, वटाणा व मटकी द्यावी यासंदर्भात निश्चित निर्णय घेण्यात येईल.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Students now have 56 days of nutritious food