esakal | मंदिरे खुली मात्र यात्रेवर बंदी, छोट्या- मोठ्या विक्रेत्यांवर आर्थिक संकटाचे ढग
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Temples open at Buldana but ban on pilgrimage, financial crisis on small and big vendors

यंदा कोरोनामुळे सर्वांचे कंबरडे मोडले असून, आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. सहा महिन्यांच्या कालावधीत अनेकांचे रोजगार बुडाले. शासनाने आता वेगवेगळ्या नियमांच्या आधारावर अनलॉक प्रक्रियेला सुरवात केली.

मंदिरे खुली मात्र यात्रेवर बंदी, छोट्या- मोठ्या विक्रेत्यांवर आर्थिक संकटाचे ढग

sakal_logo
By
विनोद झाल्टे

मेहकर (जि.बुलडाणा) : यंदा कोरोनामुळे सर्वांचे कंबरडे मोडले असून, आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. सहा महिन्यांच्या कालावधीत अनेकांचे रोजगार बुडाले. शासनाने आता वेगवेगळ्या नियमांच्या आधारावर अनलॉक प्रक्रियेला सुरवात केली.

या प्रक्रियेनंतर सर्व उद्योग व्यवसायाबरोबरच धार्मिकस्थळे उघडी करण्यात आली. त्यामुळे गावोगावी असलेली ग्रामदेवतेची मंदिरे खुली झाली. मात्र, धार्मिक कार्यक्रमातील उपस्थितीवर मर्यादा कायम असल्याने मंदिरे जरी उघडी झाली असली तरी यात्रा महोत्सव बंदच असल्याचे चित्र पाहायला मिळत असून त्याचा स्थानिक अर्थकारणावर परिणाम होऊन छोट्या मोठ्या विक्रेत्यांवर आर्थिक संकट आले आहे.


शासनाने अनलॉकची प्रक्रिया टप्याटप्याने राबविली. दिवाळीपर्यंतही राज्यातील मंदिरे उघडे न झाल्यामुळे विरोधीसह वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने गदारोळ करत मंदिरे खुले करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर मंदिरांना नियम व अटींच्या आधीन राहून मुभा देण्यात आली. मेहकर शहरासह तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे असून त्यांच्या यात्रा महोसत्व मोठया प्रमाणावर दरवर्षी साजरे केले जातात. परंतु, गेल्या मार्च महिन्यापासून देशात कोरोना संसर्गामुळे सर्वच यात्रा व महोसत्व यंदा रद्द केले किंवा साध्या पद्धतीने होत आहे.


यावर्षी कोरोना महामारीमुळे सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले तर काहींनी आपले व्यवसायत बदल केले आहे. अनलॉकमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत आहे. उद्योग व्यवसाय ही स्थिरावत आहे. सर्वच क्षेत्रात पूर्वरत कामकाज सुरू झाले आहे. शाळा, व्यायामशाळा, जिम, चित्रपट गृह याच बरोबर सर्वच ठिकाणची धार्मिकस्थळे उघडी करण्यात आली आहे. दिवाळीनंतर अनेक ठिकाणच्या ग्राम देवतांच्या यात्रेचा हंगाम सुरू होतो.

या वर्षी यात्रेचा हंगाम सुरू असून कोरोनाच्या सावटाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडू लागले आहे. यासाठी प्रशासनाने भाविकांच्या उपस्थितीवर निर्बंध लावले आहेत. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. देवतांच्या यात्रेत ही उपस्थिती संख्येचे नियम केले आहेत. यात्रा म्हटले की पाहुणे, मित्र मंडळी यांची गर्दी ओघाने आलीच.

गर्दी जमल्यास संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे तसेच लॉकडाउनचे नियम मोडल्यास प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला जाण्याची भीती आहे. त्यामुळे गावो गावच्या देवस्थान समित्या बैठका घेऊन कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यात्रा महोत्सव रद्द करण्याचे निर्णय घेत आहे. त्यामुळे प्रशासनाने मंदिरे जरी उघडी केली असली तरी यात्रा महोत्सववर बंदीच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

स्वयंस्फूर्तीने यात्रा रद्द चा होतोय निर्णय
कोरोना बधितांची संख्या पहिल्या तुलनेत जरी कमी झाली असली तरी महामारी अजून संपली नाही. लस निर्मिती सुरू असली तरी ती सर्वसामान्यच्या हातात येईपर्यंत धास्ती कायम राहणार आहे. कोरोना बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्यामुळे गावोगावच्या मंदिर समित्या स्वयंस्फूर्तीने बैठका घेऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे प्रशासनाचा ताण मोठया प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होत आहे एव्हडे मात्र खरे.

गावोगावी यात्रेत खेळण्यासह विविध वस्तूंच्या दुकान गेल्या 20 वर्षांपासून लावत आले आहे. परिसरातील यात्रेसाठी दुकाने सहा ते आठ महिन्यांपूर्वीचे मालाचे नियोजन करण्यात येते. यंदा कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली असून, यात्राही रद्द होत असल्यामुळे आगामी काळात उदरनिर्वाह कसा करणार असा सवाल निर्माण झाला आहे.
- हमीदभाई बागवान, लघु व्यावसायिक, लोणी.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image