काटेपूर्णा जलप्रकल्पाचे दहाही वक्रद्वार उघडले

मयूर जंगले
Tuesday, 22 September 2020

काटेपूर्णा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला असून, पाण्याची आवक सुरू असल्याने सोमवारी सकाळीच प्रकल्पाचे सर्व १० वक्रद्वार उघडण्यात आले. यातून नदी पात्रात मोठ्याप्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महान (जि.अकोला) :  काटेपूर्णा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला असून, पाण्याची आवक सुरू असल्याने सोमवारी सकाळीच प्रकल्पाचे सर्व १० वक्रद्वार उघडण्यात आले. यातून नदी पात्रात मोठ्याप्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण अकोलावासियांचे लक्ष वेधणारा व संपूर्ण अकोला शहराला पाणीपुरवठा करून तृष्णा भागविणारा महान येथील काटेपूर्णा जल प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गत आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे. त्यातच रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठा वाढला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

परिणामी काटेपूर्णा जलप्रकल्पातून सातत्याने विसर्ग सुरू आहे. ता. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वा. प्रकल्पातू ११४१ फुट, ३४७.७७ मीटर एवढा जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे दहाही वक्रद्वार प्रत्येकी ३० सें.मी. उघडण्यात आले. त्यातून २५५.८३ घनमीटरने प्रती सेकंदाने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

त्यानंतर सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान पाण्याची आवक वाढल्याने ६ वक्रद्वार प्रत्येकी ३० सें.मी व ४ वक्रद्वार प्रत्येकी ६० सें.मी. उघडण्यात आले. नंतर १० वाजताच्या दरम्यान २ वक्रद्वार ३० सें.मी. व ८ वक्रद्वार ६० सें.मी.उघडण्यात आले.

परत आवक वाढत असल्याने १०.३० वाजताच्या दरम्यान दहाही वक्रद्वार प्रत्येकी ६० सें.मी. उघडण्यात आले. त्यातून ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाणे पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Ten curved gates of Katepurna water project opened