ठाकरे सरकार सर्वच स्तरांवर अपयशी, आमदार नाईक यांचा आरोप

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 3 December 2020

महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असा आरोप भाजप नेते आमदार निलय नाईक यांनी केले.

अकोला : महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असा आरोप भाजप नेते आमदार निलय नाईक यांनी केले.

अकोला जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे राज्य सरकारच्या वर्ष पूर्तीनिमित्ताने सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात, महापौर सौ अर्चनाताई मसने, भाजपा प्रवक्ता व नगर सेवक गिरीश जोशी आदी उपस्थित होते.

आ. नाईक म्हणाले की, मराठा आरक्षणाचा या सरकारने खेळखंडोबा करून टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारला नीट बाजू मांडता न आल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता या सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षणही रद्द केले आहे. महाआघाडी सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना मराठा समाजात आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना या सरकारने निव्वळ बहाणे शोधले. सत्तेत आल्यावर आपण काय बोललो होतो, याचा विसर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडला आहे, असे ही या वेळी आमदार नाईक यांनी सांगितले.

अकोला जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, क्रीडा सांस्कृतिक भवन निधी अभावी काम थांबले आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील कर्क रोग हॉस्पिटल, तहसील कार्यालय इमारतींचे काम थांबले आहे.

सिंचानानांच्या प्रकल्पांना ब्रेक लावण्याचे काम महानगर पालिका व नगर पालिकांना एक दमडीची ही मदत नाही उलट शासनाने विकास कामे थांबवून चौकश्या लावून अधिकाऱ्यांना काम करू देत नाही. खारपानपट्ट्यासाठी विदर्भ व मराठवाडा विकासासाठी व शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या योजना आमदार रणधीर सावरकर यांनी पाठपुरवा करून मंजूर करून घेतल्या. परंतु या योजनेचे ही तीन तेरा या सरकारने केले आहे, असा आरोप आमदार नाईक यांनी केला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Thackeray government fails at all levels, MLA Naik alleges