४२ पदांसाठी १५९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 20 October 2020

जिल्हा परिषदेत अनुकंपाधारकांना रिक्त पदी नियुक्ती देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सोमवारपासून बुधवारपर्यंत प्रत्येक दिवशी ५०-५० पात्र उमेदवारांना बोलावून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संंबंधितांना ४२ रिक्त जागी नियुक्ती द्यायची असतानाच १५९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.
 

अकोला  :  जिल्हा परिषदेत अनुकंपाधारकांना रिक्त पदी नियुक्ती देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सोमवारपासून बुधवारपर्यंत प्रत्येक दिवशी ५०-५० पात्र उमेदवारांना बोलावून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संंबंधितांना ४२ रिक्त जागी नियुक्ती द्यायची असतानाच १५९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या १० पेक्षा अधिक विभागांमध्ये कार्यरत काही कर्मचाऱ्यांचा कार्यरत असताना आकस्मिक मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे.

त्याअंतर्गत जिल्हा परिषदेत १६९ अनुकंपाधारकांना नियुक्तीची प्रतीक्षा आहे. संबंधितांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया जिल्हा परिषदेने सुरू केली असून पडताळणीच्या पहिल्या दिवशी छत्रपती शाहू महाराज सभागृहात ५० अनुकंपाधारक उमेदवारांना बोलावण्यात आले होते. सदर प्रक्रिया १९, २० व २१ ऑक्टोबरपर्यंत पार पडेल. प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने ५० उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले होते. तीन दिवस पडताळणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर रिक्त असलेल्या ४२ जागांवर वरिष्ठतेच्या तत्वावर नियुक्ती देण्यात येईल.

या पदी होणार नियुक्ती
अनुकंपा तत्वावर पात्र उमेदवारांना कंत्राटी ग्रामसेवक, परिचर, स्थापत्य अभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य सेवक महिला या पदी नियुक्ती देण्यात येईल. परंतु भरायच्या जागा कमी व पात्र उमेदवार अधिक असल्याने १५० वर उमेदवारांना प्रतीक्षाच करावी लागेल, असे चित्र आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Verification of documents of 159 candidates for 42 posts