50 लाख शेतकऱ्यांची आज व्हर्च्युअल रॅली, कॉग्रेसचा कृषी कायद्याच्या विरोधात एल्गार

अरूण जैन 
Thursday, 15 October 2020

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसने एल्गार फुकारला असून पक्षाच्या वतीने आज, १५ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता शेतकरी बचाव व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

बुलडाणा :  केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसने एल्गार फुकारला असून पक्षाच्या वतीने आज, १५ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता शेतकरी बचाव व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीच्या माध्यमातून खा. राहुल गांधी यांच्यासह इतरही काँग्रेस नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्कल निहाय फेसबुक, ट्विटर केबल नेटवर्कच्या माध्यमातून रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिली आहे.

भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर लोकशाही व संसदेचे सर्व नियम पायदळी तुडवून शेतक-यांवर कृषी कायदे लादले आहेत. उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणलेल्या या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार असून शेतक-यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. कृषी विधेयकाला विरोध करत देशातील अनेक भागात शेतकरी आंदोलने करीत आहे .

पंजाब हरियाणा राज्यामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरला आहे तर कर्नाटक बिहार महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यांमध्येही शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरुच राहणार असून १५ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजता शेतकरी बचाओ रॅलीचे १० हजार गावात एकाच वेळी आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख कार्यक्रम राज्यातील पाच ठिकाणी राहणार असून हे सर्व कार्यक्रम एकमेकाशी इंटर कनेक्ट असून पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियावरही ही रॅली पाहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून ५० लाख शेतकऱ्यांपर्यँत पोहचण्याचा प्रयत्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा असल्याची माहिती राहुल बोंद्रे यांनी दिली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Virtual rally of 50 lakh farmers today, Congress Elgar against agriculture law