esakal | परतीच्या पावसाने स्वप्नाचा झाला चिखल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Huge losses to farmers in Washim, Buldana district due to return rains

गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. रविवारी (ता.११) सकाळपासून मुसळधार पावसाने कापलेले सोयाबीन पावसात वाहून गेले आहे. कपाशीचेसुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मालेगाव व रिसोड तालुक्यात ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

परतीच्या पावसाने स्वप्नाचा झाला चिखल

sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम  ः गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. रविवारी (ता.११) सकाळपासून मुसळधार पावसाने कापलेले सोयाबीन पावसात वाहून गेले आहे. कपाशीचेसुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मालेगाव व रिसोड तालुक्यात ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पांघरी नवघरे ः मालेगाव तालुक्यातील पांघरी नवघरे येथे पावसामुळे गावातील नदी नाले सर्वत्र एकत्र होऊन तसेच शेतातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सूडीच्या खालून पाणी शिरून पिकाचे अतिप्रमाणात नुकसान झाले आहे. गावानजीक असलेल्या लहान पूलाची उंची कमी असल्यामुळे या पुलावरून सुद्धा जमिनीपासून चार ते पाच फूट पाणी वाहत असून, त्यामुळे सर्व रस्ते बंद झाले आहेत व वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे.


शिरपूर ः शिरपूर जैन येथे रविवारी (ता.११) सकाळी ८ वाजेपासून जोरदार पाऊस झाला. ११ वाजेपर्यत सुमारे ४१ मिमी पावसाची नोंद झाली.
शिरपूर येथील पर्जन्यमापक गजानन वाढे यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाची, यावर्षी नोंद झाली आहे. यावर्षी एकूण ११४७ मिमी एवढा पाऊस झाला आहे. पडलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांची मात्र दानादाना उडाल्याचे चित्र आहे.

अनेक शेतकऱ्यांची सोंगलेले सोयाबीन भिजले तर, काहींच्या गंजीमध्ये पाणी जाऊन नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र आहे. शेतातील सोयाबीन सोंगणीचे काम सध्या जोमाने सुरू असून ता 11 रोजी सुरू झालेल्या धुवाधार पावसाने अनेक शेतकऱ्यांची मोठी दाणादाण उडवली. उभ्या असलेल्या पिकांच्या शेतात ही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने त्याचा फटका पिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर निश्चितच तूर, हळद या पिकांना नुकसान पोहोचू शकते. शिरपूर येथे रविवारपर्यंत १११७ मि.मी. पाऊस पडला.


मानोरा : तालुक्यात रविवारी (ता.११) सकाळपासून परतीचा पाऊस सुरू होता. विजेच्या कडकडाटासह, जोरदार पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस समाधानकारक आला. सोयाबीन सोंगणी, काढणी सुरू असताना परतीचा पावसाने रविवापासून जोरदार हजेरी लावली.त्यामुळे शेतात सोयाबीन सोंगूण पडले आहे तर, काही शेतकरी सोंगणी, मळणी करीत आहेत. त्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. कपाशीला सुद्धा बोंडी धरली आहेत. पात्या आल्या आहेत. या पावसामुळे कपाशीचे नुकसान आहे. फळबागांचेही नुकसान आहे. पावसाचे पाणी शेतात साचले आहे. एकूणच या परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

परतीचा पाऊस दमदार आल्याने अनेक पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, फळबागामध्ये संत्रा, हळद, या पिकांना धोका आहे.
- विनोद सवने, मंडळ कृषी अधिकारी, मानोरा

 
रिसोड ः तालुक्यात परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षीही मागील वर्षीप्रमाणेच ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक परतीच्या पावसाच्या कचाट्यात अडकले आहे. मागील तीन-चार दिवस उघडी बसल्यामुळे व पीक कापणीला आल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून ठेवले तर, काही शेतकऱ्यांचे सोयाबीन कापणी करायचे राहिली असून, शेतात पाणी साचल्यामुळे कापलेल्या तसेच उभ्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भागातील गावनिहाय कापलेल्या तसेच उभे असलेल्या पिकाचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटना करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)