अमरावती शिक्षक मतदारसंघ; पैठणी गाजली पण, प्रस्थापितांना घाम फोडणारे किरण सरनाईक आहेत कोण?

विवेक मेतकर
Friday, 4 December 2020

मरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आता लागला.  अपक्ष अॅड. किरणराव सरनाईक हे विजयी झाले. 

अकोला: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आता लागला.  अपक्ष अॅड. किरणराव सरनाईक हे विजयी झाले. 

या निवडणूकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही मात्तबर पक्षांना धूळ चारत त्यांनी हा विजय मिळवला.

मात्र, उमेदवारांच्या भाऊगर्दीत अन् बड्या राजकीय पक्षांच्या झटापटीत फारसे चर्चेत नसलेले सरनाईक नेमके आहेत कोण आणि त्यांनी हा विजय कसा मिळवला हा प्रश्न सामान्य जनतेला निश्चितच पडला असेल.

या निवडणूकीतमाजी मुख्यमंत्री, मंत्री, मोठ-मोठे नेते यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पाचही जिल्हे पिंजून काढले. सभा, बैठका घेतल्या. यात भाजप आणि महाविकास आघाडीचीच चर्चा होते. पण, त्यांना मात देऊन किरणराव विजयी झाले.

 किरणराव सरनाईक आहेत तरी कोण ?
किरणराव सरनाईक हे वाशीम जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था त्यांचे वडील दिवंगत अप्पासाहेब सरनाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्थापन केली होती. वाशीम आणि रिसोड तालुक्यात या संस्थेचे जाळे आहे. किरणराव पेशानं वकील असून, त्यांचं शिक्षण बीएएलएलबीपर्यंत झालं आहे.

तसेच ते अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्षही होते. अमरावती विभागातील संस्था चालक मंडळाचे ते विभागीय अध्यक्षही राहिले आहेत. अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसचे माजी अध्यक्षही होते. विद्यार्थी संघाचे ते माजी अध्यक्षही राहिले आहेत. त्यांचे वडीलही विदर्भ काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी होते. विशेष म्हणजे मागील 50 वर्षांपासून सरनाईक घराणं हे काँग्रेस पक्षाच्या सोबत होतं. किरणराव मृदू स्वभावाचे आणि सर्व राजकीय पक्षांशी जुळवून घेणारे समजले जातात.

आई आमदार 
किरणराव यांच्या आई मालतीबाई सरनाईक ह्या देखील विधान परिषदेच्या आमदार होत्या. त्यांनी १९५८ ते १९६४ या कालावधीत विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले होते. त्यांचे लहान भाऊ अरुणराव सरनाईक हे वाशीम नगर परिषदेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. किरणराव सरनाईक हे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख व पाथरी आमदार सुरेश वरपूडकर यांचेही जवळचे नातेवाईक आहेत. 

असा मिळवला विजय?
किरणराव सरनाईक यांनी कुठेही मोठा गवगवा न करता आपली प्रचार यंत्रणा राबविली. गेल्या चार वर्षांपासून अमरावती विभागीय शिक्षक संघ व अमरावती विभागातील संस्था चालक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी मतदार व संस्था चालक यांच्याशी संपर्क राखून ठेवला होता. प्रयेक तालुक्यासाठी निरीक्षक नेमून त्यांच्यामार्फत डोअर टू डोअर प्रचार करून मतदार शिक्षकांपर्यंत ते पोहचले होते. प्रचार यंत्रणेची धुरा त्यांचे पुत्र स्नेहदीप सरनाईक यांनी सांभाळली होती.

 निवडणुकीत पैठणी गाजली
या निवडणुकीत प्रचारादरम्यान मतदारांना आमिष म्हणून प्रत्येकी १ पैठणी आणि १००० रुपये दिल्याचा आरोप त्यांच्यावर रिसोड येथील मतदाराने केलेेला आहे. त्यावरून त्यांच्या विरुद्ध आचार संहिता भंगाचा गुन्हा नोंद आहे.भविष्यात त्यांना याचे उत्तरही द्यावे लागेलच. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Who is Kiran Sarnaik who is sweating for the incumbents in Amravati Shikshak constituency?