जिल्हा परिषदेच्या शिकस्त शाळांची होणार दुरुस्ती

सुगत खाडे  
Saturday, 10 October 2020

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा शिकस्त झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना जीव मुठीत ठेवून अध्ययन करावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून दयनीय स्थितीतील शाळांची दुरुस्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. ९) शिक्षण समितीच्या ऑनलाईन पार पडलेल्या सभेत घेण्यात आला.

अकोला : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा शिकस्त झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना जीव मुठीत ठेवून अध्ययन करावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून दयनीय स्थितीतील शाळांची दुरुस्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. ९) शिक्षण समितीच्या ऑनलाईन पार पडलेल्या सभेत घेण्यात आला. यावेळी शाळांच्या दुरूस्तीचे नियोजन सुद्धा करण्यात आले. सभेत इतर विषयांवर सुद्धा चर्चा करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांची स्थिती सुमार आहे. विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटच्या तुलनेत मिळणारा शिक्षणाच्या दर्जा सुद्धा जेमतेम आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येला गळती लागत आहे. दरम्यान पटसंख्या वाढवण्यासह विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.

सदर बाब लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासह विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यातील शिकस्त असलेल्या शाळांची दुरूस्ती करण्याचे नियोजन शुक्रवारी (ता. ९) ऑनलाईन पार पडलेल्या शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आले.

Video: एकदा शेतकरी कायदा समजून घ्या! ही केवळ कायदेशिर धूळफेक- प्रशांत गावंडे

सभेची अध्यक्षता शिक्षण सभापती चंद्रशेख पांडे गुरूजी यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामकुमार गव्हाणकर, पवन बुटे, गणेश बोबडे, वर्षा वजीरे, रंजना विल्हेकर, आम्रपाली खंडारे, प्रगती दांदळे, रिझवाना परवीन शेख मुख्तार, प्रमोद फाळके यांच्यासह सभेच्या सचिव शिक्षणाधिकारी वैशाली ठग व इतर उपस्थित होते.

या विषयांवरही झाली चर्चा
- सभेत पंचायत समिती, अकोट अंतर्गत ठोकबर्डी येथे नवीन शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभाग जि.प. कडून अंतिम चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- संगणक प्रोजेक्टर करिता ५ शाळांची निवड करण्यात आली.
- ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेण्यात आला.
- पंचायत समिती, बाळापूर अंतर्गत शिक्षकांचे अर्थविषयक प्रलंबित प्रश्न सोडविणेकरीता लेखाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समितीची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Zilla Parishad defeated schools to be repaired