आता बोला! दीड लाख कार्डधारकांना राशनच नाही, कशी पेटवावी चूल

सुगत खाडे  
Friday, 28 August 2020

एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्तीमागे देण्याचा शासनाने घेतला होता. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट महिन्यांचे धान्य सवलतीच्या दरात मिळणार होते.

अकोला : एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्तीमागे देण्याचा शासनाने घेतला होता. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट महिन्यांचे धान्य सवलतीच्या दरात मिळणार होते.

परंतु धान्य वितरणास शासनाने अखडता हात घेतल्याने जिल्ह्यातील लाभार्थ्यांना जुलै महिन्यासाठीच सवलतीच्या दरात धान्य देण्यात आले. दुसरीकडे ऑगस्ट महिना संपायला जेमतेम दिवस शिल्लक असल्यानंतर सुद्धा लाभार्थ्यांना वर्तमान महिन्याचे धान्य मिळाले नसल्याने जिल्ह्यातील दीड लाख लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

एपीएल (केशरी) मधील ज्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच १४ जिल्ह्यातील शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नाही, अशा केशरी गटातील लाभार्थ्यांना माहे मे व जून २०२० या दो महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला होता.

टाळेबंदीच्या काळात सदर निर्णयाचा जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांना लाभ मिळाला. परंतु त्यानंतर मात्र शासनाने पुढील महिन्यात धान्य वाटप करण्याचे जाहीर केले नाही. दरम्यान, १० जुलै रोजी शासनादेश जारी करुन केशरी शिधापत्रिकाधरकांना जुलै व ऑगस्टसाठी धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला होता.

धान्य न उचलणाऱ्यांचे रेशन होणार बंद | eSakal

त्याअंतर्गत एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात गहू व तांदूळ मिळणार होते. परंतु नंतर सदर धान्य देण्यास शासनाने हात अखडता घेतल्याने लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.

केवळ आदेशच दिला धान्य नाही
शासनाने लाभार्थ्यांना धान्य देण्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात मात्र धान्य दिले नाही. सदर धान्य केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरात मिळावे यासाठी राज्य शासनाने पैशाचा भरणा केला नसल्याची माहिती आहे. परंतु शासनादेश जारी होताच जिल्हा स्तरावर पुरवठा विभागाने शिल्लक असलेल्या साठ्यातून धान्य वाटप केल्यामुळे लाभार्थ्यांना जुलैचे धान्य मिळाले.
 
अशी आहे जिल्ह्याची स्थिती

  • केशरी कार्डधारक - १ लाख ४० हजार ४४४
  • लाभार्थी सदस्य - ६ लाख ५ हजार ४५४
  • मिळणारे धान्य - ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ (प्रती व्यक्ती)
  • सवलत मूल्य - गहू ८ रुपये व तांदुळ १२ रुपये प्रतिकिलो
  • केशरी कार्डधारकांना जुलै व ऑगस्टसाठी सवलतीच्या दरात धान्य देण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यामुळे लाभार्थ्यांना शिल्लक असलेल्या धान्य साठ्‍यातून जुलै महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे धान्य शासनाकडून प्राप्त झाले नाही.
    - बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला
    (संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola orange cardholders await August grain