Akola News: थकीत मालमत्ता करासाठी जप्त मालमत्तांचा होणार लिलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News

Akola News: थकीत मालमत्ता करासाठी जप्त मालमत्तांचा होणार लिलाव

अकोला : महापालिकेने थकीत कराचा भरणा न केल्याने आतापर्यंत एकूण २८ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या जप्त मालमत्तांचा थकित कर भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा मालमत्तांचा लिलाव करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडली आहे.

महापालिका मालमत्ता कर विभागाला १२२ कोटी १९ लाख ८३ हजार ८७२ रुपयाचा थकीत मालमत्ता कर वसुल करावा लागणार होता.

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २४ कोटी २० लाख ४५ हजार ४३८ रुपयाचा थकीत मालमत्ता कर वसुल झाला आहे. थकित कर वसुलीसाठी मालमत्तांना सिल लावण्याची कारवाई सुरू आहे.

ज्या नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात तसेच अनेक वर्षापासून कर थकीत आहे, अशा मालमत्तांना सिल करण्यात आल्या आहेत. आता पर्यंत २८ पेक्षा जास्त मालमत्तांना सिल लावण्याची कारवाई करून मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

सिल लावल्यानंतरही संबंधित मालमत्ताधारकांनी थकीत कराचा भरणा न केल्याने मनपा प्रशासनाने या २८ मालमत्ताधारकांना जाहिर सूचनेच्या माध्यमातून १५ दिवसांच्या आत थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याचे आवाहन केले आहे.

व्यापारी, राजकीय पुढाऱ्यांवर संकट

महापालिका प्रशासनाने जप्त केलेल्या २८ मालमत्तांपैकी बहुतांश व्यापारी आणि राजकीय पुढाऱ्यांच्या मालमत्ता आहेत. त्यामुळे त्यांच्या मालमत्ता जप्तीचे संकट ओढविले आहे. या २८ मालमत्तांकडे एकूण एक कोटी ३४ लाख १२ हजार ८०४ रुपयाचा मालमत्ता कर थकीत आहे.