
अकोला : आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश!
अकोला : आरटीईअंतर्गत प्रवेशाची लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी २७ मे पर्यंत संबंधित शाळेत प्रवेश घेवू शकतील. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस मिळण्यास सुरूवात झाली असून मेसेज न आल्यास पालकांनी शासनाच्या संकेतस्थळावर जावून पडताळणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.
दरम्यान यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आली. त्यासोबतच प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्यांची निवड लॉटरी काढून शासन स्तरावरून करण्यात आली आहे. लॉटरीमध्ये निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली. परंतु आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
१ हजार ४५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश
आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील १९६ शाळांना नोंदणी केली होती. संबंधित शाळांमधील १ हजार ९९५ जागा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संबंधित जागांसाठी ६ हजार ३ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले. म्हणजेच ४ हजार ७ अर्ज जास्त प्राप्त झाले, अर्ज करणाऱ्यांपैकी १ हजार ९२० विद्यार्थ्यांना लॉटरी लागली, तर त्यापैकी १ हजार ४५३ विद्यार्थ्यांचे खासगी शाळेत प्रवेश निश्चित झाले आहेत.
प्रतीक्षा यादीतील १४ विद्यार्थ्यांना प्रवेश
प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता कागदपत्रांची पडताळणी करणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशही मिळाला आहे, तर १ ४३१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला गती मिळेल.
Web Title: Akola Rte Admission Process Admission Free To Waiting List Students
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..