शहरातील शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली नाेटीस

सुगत खाडे  
Monday, 24 August 2020

शाळेच्या कारभाराच्या चाैकशीसाठी चार जणांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यात निवृत्त उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेमधील तज्ज्ञांचा समावेश आहे.

अकोला  ः बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करुन पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी एमराल्ड हाईट्स स्कूलच्या (रंग राेड, केशवनगर) मुख्याध्यापिका, अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध खदान पोलिसस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता शाळेबाबत उच्चस्तरीय समिती चाैकशी करणार आहे. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, असा सवाल यापूर्वीच्या एका समिती काढलेल्या निष्कर्षावरुन नाेटीसमध्ये विचारला आहे.

स्थानिक केशव नगरातील एमराल्ड हाईट्स स्कूलबाबत पालकांनी प्रशासनाकडे तक्रार केली हाेती. त्यानंतर या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक चाैकशीसाठी समिती स्थापन केली होती. चाैकशीअंतर्गत समितीने पालक, शाळेच्या मुख्याध्यापिकांशीही चर्चा केली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शाळेची पाहणीही केली. त्यानंतर समितीने शिक्षण विभागाला अहवाल सादर केला. या अहवालात स्कूलमध्ये आढळून आलेल्या गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला. त्यानुसार अखेर शुक्रवारी स्कूलचे अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापिकेविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर आता शिक्षण विभागाने शाळेची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये या आशयाची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावल्या होत्या. परंतु शाळेकडून खुलासा प्राप्त झाला नाही.

....तर शासनाकडे जाणार मान्यता रद्दचा प्रस्ताव
- एमराल्ड हाईट्स स्कूलला (रिंग राेड, केशवनगर) तिसऱ्या नाेटीसमध्ये इशाराच दिला आहे. खुलासा प्राप्त न झाल्यास शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) आणि शुल्क अधिनियमचा भंग केल्याच्या कारणावरुन शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी तिसऱ्या नाेटीसमध्ये स्पष्ट केले आहे.

त्यासोबतच शाळेच्या कारभाराच्या चाैकशीसाठी चार जणांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यात निवृत्त उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेमधील तज्ज्ञांचा समावेश आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola school was warned by the education authorities