Akola News: आजपासून विदर्भाची कृषी पंढरी दुमदुमणार

पाच दिवसीय ‘ॲग्रोटेक’ राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आज उद्‍घाटन
Akola News
Akola Newssakal

अकोला : विदर्भाची कृषी पंढरी म्हणून ओळख असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आजपासून ‘ॲग्रोटेक २०२२’ पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा आजपासून प्रारंभ होत असून, या ठिकाणी कृषीचे नवतंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी दररोज हजारो शेतकऱ्यांची रेलचेल पाहयला मिळणार आहे.(Akola News)

कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२४ व्या जयंती दिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान या पाच दिवसीय राज्यस्तरीय ‘ॲग्रोटेक २०२२’ कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन डॉ.पंदेकृवि, कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अकोला यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत या कार्यक्रमाचा उद्‍घाटन सोहळा पार पडणार आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिकूलपती अब्दुल सत्तार प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहेत. यावेळी अकोला जिल्ह्याचे खासदार ॲड. संजय धोत्रे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीताताई आढाऊ विशेष अतिथी असतील. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची सन्माननिय अतिथी म्हणून तर, आमदार डॉ.रणजीत पाटील, आमदार अमोल मिटकरी, आमदार विप्लव बाजोरिया, आमदार ॲड. किरण सरनाईक,

आमदार वसंत खंडेलवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार नितीन देशमुख, यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप, जनार्दन मोगल, मोरेश्वर वानखेडे, केशवराव तायडे, प्रशांत कुकडे, डॉ. विजय माहोरकर, डॉ. वाय.जी. प्रसाद, अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनीची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून, समस्त शेतकरी बंधू-भगिनी, कृषीशी निगडित मंडळी, युवक-युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा

आत्मा समिती अध्यक्ष निमा अरोरा, विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे (अमरावती) व डॉ.राजेंद्र साबळे (नागपूर) यांनी केले आहे.

चार मोठे डोम व ४०० हून अधिक स्टॉल

या राज्यस्तरीय प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, चार मोठे डोम व इतर माध्यमातून ४०० हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. ज्यामध्ये राज्यभरातील विद्यापीठांमध्ये निर्मित प्रगत कृषी तंत्रज्ञान,

राज्य शासनाचा कृषी विभाग, जैविक शेती मिशन, महाबीज सह विविध राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील शेती आणि ग्रामविकासाशी संबंधित संस्था, कृषी निविष्ठांच्या उत्पादक कंपन्या, यंत्र अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या, बी-बियाणे खते, औषधे, सेंद्रिय निविष्ठा आदींच्या उत्पादक कंपन्या, कृषी विद्यापीठातून शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या आणि स्वतः उद्योजक म्हणून सेवारत असणाऱ्या कृषी पदवीधरांची दालने, विदर्भातील स्वयं सहाय्य बचत गटांच्या माध्यमातून निर्मित कृषी पूरक उत्पादने व खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील समाविष्ट आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com