

Akola Water Crises
esakal
अकोला : शहरातील अकोट फाईल, गवळीपुरा आणि नायगाव परिसरातील नागरिकांना अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे. काही भागांत तब्बल १२ ते १५ दिवसांच्या अंतराने नळाला पाणी येत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली असून, नियमित पाणीपुरवठ्यासोबतच स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नळाला पाणी येण्याचे निश्चित वेळापत्रक नसल्याने नागरिकांना पाण्याची साठवणूक करून ठेवावी लागत आहे. अनेक दिवस प्रतीक्षा केल्यानंतर नळाला पाणी आल्यानंतरही काही ठिकाणी गढूळ पाणी येत असल्याची तक्रार आहे.
त्यामुळे घरगुती वापरासाठी नळाचे पाणी घेतले जात असले, तरी पिण्यासाठी त्यावर अवलंबून राहणे शक्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नियमित नळपाणी उपलब्ध होत नसल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी विक्रेत्यांकडून पाणी घ्यावे लागत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, २० रुपयांचा कॅन किंवा १० रुपयांना गुंड अशा स्वरूपात पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे घरखर्चात पाण्यासाठी दररोज अतिरिक्त रक्कम खर्च होत आहे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
अकोट फाईल, गवळीपुरा आणि नायगाव परिसरातील काही भागांत बोरिंगची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, काही बोरिंग नियमित सुरू राहत नसल्याची, तर काही ठिकाणी भूजलपातळी कमी झाल्याने पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था असूनही पाणीटंचाईचा प्रश्न कायम असल्याचे चित्र आहे.
अनेक दिवसांनी नळाला पाणी येऊन तेही गढूळ असल्यास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करायची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पाणीपुरवठ्याचे अंतर, उपलब्ध पाण्याचे प्रमाण आणि पाण्याची गुणवत्ता याबाबत महापालिका प्रशासनाने स्पष्टता देण्याची गरज आहे. तसेच संबंधित भागातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
१२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी मिळण्याऐवजी किमान पाच ते सात दिवसांच्या अंतराने तरी नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करून त्यानुसार पुरेशा दाबाने आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.