esakal | Akola: सणासुदीच्या दिवसांत पाणीपुरवठा विस्कळीत!
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपुरवठा

अकोला : सणासुदीच्या दिवसांत पाणीपुरवठा विस्कळीत!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : नागरिकांना सुरळीत व नियमित पाणी पुरवठा करता यावा यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या जलकुंभातून पाणी पुरवठा करण्याची चाचणी महापालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी १५ दिवस शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असून काही भागांमध्ये गढूळ किंवा कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सणासुदीच्या दिवसातच असा प्रकार होणार असल्याने नागरिकांना त्याचा भुर्दंड बसणार आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या जोगळेकर प्लॉट व लोकमान्य नगर तसेच अकोट फाईल (जोड जलकुंभ) येथील जलकुंभातून पाणी वितरण चाचणी सुरु आहे.

हेही वाचा: Lakhimpur : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला अटक

त्यासोबतच जोगळेकर प्लॉट व लोकमान्य नगर येथील नवीन जलकुंभातून प्रभाग क्र. ९,१०, १७ आणि १८ व अकोट फाईल येथील जलकुंभातून प्रभाग क्रमांक १,२ व ३ मधील भागात पाणीपुरवठा वितरण होत असल्याने पुढील १५ दिवस या भागाला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. याव्यतिरिक्त या भागात पाणी पुरवठा कमी दाबाने अथवा खंडित राहण्याची किंवा नियोजित वेळेपेक्षा उशीराने होण्याची तसेच गढूळ पाणी येण्‍याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे प्रभाग क्रमांक ९, १०, १७ व १८ तसेच प्रभाग क्रमांक १, २, ३ मधील नागरिकांनी याची नोंद घेवून पिण्‍याच्‍या पाण्याची पुरेशी साठवणूक करावी व पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी केले आहे.

हेही वाचा: भरवेगात जाणार्‍या ट्रकची बाईकला धडक लागून अपघात; एकाचा मृत्यू

नळ जोडणी वैध करण्‍यासाठी अभय योजनेचा लाभ घ्‍यावा

केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध भागात नवीन एचडीपीई जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यामुळे जुनी पीव्हीसी जलवाहिनी पुढील १५ दिवसांमध्ये बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शेवटची संधी म्हणून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अभय योजना सुरू असल्याने नागरिकांनी फक्‍त ४०० रुपये भरून नळ कनेक्शन वैध करून घ्‍यावे.

त्यानंतर अशा प्रकारची योजना राबविली जाणार नसल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घेवून त्यांचे अवैध नळ कनेक्शन नव्याने मिटर बसवून तात्काळ वैध करून घ्यावे. अन्यथा तपासणी मोहिमेदरम्यान अवैध नळ कनेक्शन आढळून आल्यास संबंधितांची नळ जोडणी खंडीत करून त्‍यांचेविरुध्‍द फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा सुद्धा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

loading image
go to top