अकोला : जगाच्या पोशिंद्यालाच गव्हाची प्रतीक्षा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wheat distribution stopped

अकोला : जगाच्या पोशिंद्यालाच गव्हाची प्रतीक्षा!

अकोला - जिल्ह्यातील एपीएल रेशनकार्डधारक शेतकऱ्यांना गत दोन महिन्यांपासून सवलतीच्या दरात करण्यात येत असलेल्या गव्हाचे वितरण बंद आहे. शेतकऱ्यांना गहू मिळावा यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने भारतीय खाद्य निगमकडे तब्बल आठ कोटी रुपये जमा केले आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने गहू वापट करण्यासाठी गव्हाचा पुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांना केवळ तांदुळाचेच वितरण करण्यात येत आहे.

राज्यात दुष्काळाच्या काळात १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शासनाने अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करीत तीन रुपये किलो तांदूळ व दोन रुपये किलो गहू या सवलतीच्या दराने एका कुटुंबाला प्रतिमहिना जास्तीत जास्त २५ किलो धान्याचा लाभ देण्यास पात्र ठरविले होते. जिल्ह्यातील ४२ हजार ७९१ शेतकरी कुटुंबांतील एक लाख ७३ हजार ५४२ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे.

शेतकरी आत्महत्या थांबवी यासाठी सदर योजना शासनाने सुरु केली आहे. त्यामुळे योजनेचा शेतकऱ्यांना दिलासा सुद्धा मिळत आहे, परंतु असे असले तरी जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांना गत दोन महिन्यापासून गव्हाचे वाटप बंद आहे. जुलै महिना संपायला सुद्धा जेमतेम दिवस शिल्लक असल्याने या महिन्यासाठी सुद्धा अद्याप गहू उपलब्ध न झाल्याने जगाच्या पोशिंद्यालाच गव्हापासून वंचित रहावे लागत असल्याचे दिसून येते.

असे मिळते धान्य

  • लाभार्थी शेतकऱ्यांना दोन रुपये प्रति किलोने चार किलो गव्हाचे वापट करण्यात येते. सदर वाटप प्रति व्यक्तीया हिशोबाने करण्यात येते.

  • लाभार्थ्यांना तीन रुपये प्रति किलो या प्रमाणे एक किलो तांदुळाचे वाटप करण्यात येते. सदर वाटप प्रतिव्यक्ती एक किलो या प्रमाणे करण्यात येते.

गत दोन महिन्यापासून लाभार्थी एपीएल शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावरून गव्हाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना गव्हाचे वाटप रखडले आहे, तर तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे. गव्हाचा पुरवठा व्हावा यासाठी पुरवठा विभागाने आठ कोटी रुपये एफसीआयकडे जमा केले आहेत.

- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला