अकाेला : नाफेडचा हरभरा पोलिसांच्या निगराणीत

येवती येथून ट्रक जप्त : कोट्यावधीच्या हेराफेरीची तालुक्यात चर्चा
Akola Yevati gram Truck confiscated
Akola Yevati gram Truck confiscatedsakal

वाशीम : नाफेडच्या मालकीचा व वखार महामंडळाच्या कस्टडीत असलेला हरभरा पोलिसांना रिसोड तालुक्यातील येवती गावात सापडला. हा योगायोग नसून यामधे कोट्यावधींच्या हेराफेरीच्या साखळीतील एक कडी असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे. सध्या चाळणीच्या नावाखाली येवतीत गेलेले वाहन ग्रामीण पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले असून या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली तर गोरखधंद्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता तालुक्यातील सहकार क्षेत्रातील जाणकाराकडून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचा हरभरा हमी भावाने खरेदी करून त्याची साठवणूक वखार महामंडळाअंतर्गत असलेल्या गोदामात केली जाते. विविध खरेदी संस्थांकडून नाफेडसाठी ही खरेदी होते. खरेदी केलेल्या मालाची मालकी शासनाची तर देखरेख वखार मंडळाची असते. यामध्ये मालाची आवक जावक नोंद तसेच पोत्यावर शिक्का मारला जातो. मात्र शुक्रवारी नाफेडचा हरभरा घेवून रिसोडकडे निघालेले आयशर वाहन येवती गावात दाखल झाले. हे वाहन रिसोडकडे जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाल्याने ग्रामीण पोलिसांनी येवती येथून हे वाहन जप्त करून वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात लावले.

मात्र हा हरभरा खराब झाल्याने चाळणी करण्यासाठी येवती येथे नेल्याचा खुलासा वाहन चालक व इतरांनी केला. वास्तविक शासनाच्या मालकीचा माल असा बाहेर नेता येत नाही. तसेच येवती सारख्या लहान गावात चाळणीचे प्रयोजन कसे? नाफेडकडे चाळण्या नाहीत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे उत्तर पोलिसांनी सखोल चौकशी केली तर मिळण्याची शक्यता आहे.​गेल्या तीन दिवसांपासून हे वाहन पोलिस ठाण्याच्या आवारात उभे आहे. यामध्ये अजून गुन्हा नोंद झाला नाही. पोलिसांनी या बाबीचा गंभीरतेने तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये अनेक बडे मासे सक्रिय असल्याची चर्चा आहे.

ट्रकमधील हरभरा नाफेडच्या मालकीचा आहे. गोदामात माल मोजून घेताना २ ते ३ टक्के घट दाखविली जाते. त्यानंतर गोदामात पोत्याला बांबू मारून धान्य साठविले जाते. दहा ते पंधरा दिवसानंतर हे सांडलेले शेकडो क्विंटल धान्य लंपास केले जाते. यासाठी संस्था किंवा शेतकऱ्यांच्या नावाने नोंदणी केली जाते. नंतर हेच धान्य नाफेडलाच विकले जाते. यामधे लाखो रूपये लाटणारे रॅकेट सक्रीय आहे अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे. गाडीवरील चालक हा कळसुत्री बाहुली असून यातील बाहुबली हा माल सोडविण्याच्या खटपटी करीत असल्याची चर्चा आहे.

ग्रामीण पोलिसांची तत्परता

गुप्त माहितगाराकडून या वाहनाबाबत ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने वाहनाचा पाठलाग करत येवती येथून हे वाहन ताब्यात घेतले. पोलिसांना थोडा जरी उशीर झाला असता तर हे वाहन गोरेगाव मार्गे मराठवाड्यात दाखल झाले असते. पोलिसांच्या तत्परतेचे जनमानसात कौतुक केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com