Akola : जिल्हा परिषद उपकर योजनेत घोळ; एक लाभार्थी सलग तीन वर्षे पात्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Zilla Parishad

Akola : जिल्हा परिषद उपकर योजनेत घोळ; एक लाभार्थी सलग तीन वर्षे पात्र!

अकोला : जिल्हा परिषद उपकर (सेस फंड) निधीतून राबविण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या योजनांमध्ये लाभार्थी घोळ उघडकीस आला आहे. गेले तीन वर्षांपासून एकाच लाभार्थ्याला लाभ दिला जात आहे. लाभार्थी याद्यांची उलट तपासणी होत नसल्याने सर्वच योजनांमध्ये दरवर्षी सारखेच लाभार्थी आढळून येत असल्याने जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षांनी याबाबत सत्ताधारी व प्रशासनाच्या कारभारावर आक्षेप घेतले आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत उपकरातून दरवर्षी शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याचे वाटप केले जाते. अनुदानावर वाटप करण्यात येणाऱ्या साहित्यासाठी पंचायत समिती स्तरावरून लाभार्थी निवड केली जाते. या याद्या जिल्हा परिषद कृषी विभागाकडे आल्यानंतरही त्याला सभापतीच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समितीच्या सभेत मान्यता दिली जाते. एका लाभार्थ्याने एकवेळ लाभ घेतल्यानंतर तोच लाभ त्याला पुढील पाच वर्षे घेता येत नसल्याने या याद्यांची जिल्हा परिषदेत काटेकोर तपासणी होणे अपेक्षित असते. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थी हस्तक्षेपामुळे याद्यांची तपासणी होत नाही. त्यातून एकच लाभार्थी दरवर्षी सारखाच लाभ घेत असल्याचे प्रकार घडत आहे.

एकट्या अकोला तालुक्यातील लाभार्थी यादीमध्येच अनेक लाभार्थी हे गेले तीन वर्षांपासून एकसारखा लाभ घेत असल्याची बाब शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर व काँग्रेसचे सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी कृषी विकास अधिकारी इंगळे यांच्या लक्षात आणून दिली. यात ताडपत्रीसाठी एकच लाभार्थी हा २०२१-२२ व २०२२-२३ च्या यादीत आढळून आला. याशिवाय एचडीपी पाईप, मोटारपंप आणि पॉवर स्पेअरच्या लाभार्थी यादीतही गेले तीन वर्षांत लाभ घेणाऱ्या लाभार्थीची नावे असल्याचा दावा शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर यांनी केला आहे.

प्रशासनाचे पदाधिकाऱ्यांकडे बोट

कृषी विभागाच्या योजनेत लाभार्थी याद्यांमधिल घोळ शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे यांनी यात प्रशासनाची चूक नसून, पदाधिकाऱ्यांनी दिलेली नावे समाविष्ट करण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामुळे अशी नावे लक्षात आल्यास ती वगळून पुरवणी यादी सादर केली जाईल, असेही कृषी विकास अधिकारी यांनी स्पष्ट केले.

योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दलाल सक्रीय

जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय असल्याची बाब या निमित्ताने उघडकीस आली आहे. काँग्रेसचे सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांच्या वाडेगाव सर्कलमधिल लाभार्थ्यांची नावे ही परस्पर यादीत समाविष्ट करण्यात आल्याची बाब त्यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा अधिकाऱ्यांनी याबाबतही पदाधिकाऱ्यांकडे बोट दाखविले. पदाधिकाऱ्यांचा या लाभार्थ्यांशी संबंध नसल्याने पदाधिकाऱ्यांच्या मार्फत योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय असल्याचा आरोप शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे.

अशी आहे योजना

योजना निधी लाभार्थी

प्लॅस्टिक तापडपत्री ३५ लाख ११९६

एचडीपीई पाईप २६ लाख ४१३

इलेक्ट्रिक मोटारपंप २५ लाख १२६

पॉवर स्पेअर (फवारणी यंत्र) ५ लाख २०६