अकोल्याच्या ‘विजय’चा पहिल्याच प्रयत्नात ‘युपीएससी’त विजय

Vijay Gite.jpg
Vijay Gite.jpg

अकोला : जिद्द, चिकाटीसह ध्येयाचा पाठलाग करत अकोल्याच्या ‘विजय’ने ‘युपीएससी’त पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. केवळ एका वर्षात त्याने यशाचा हा पल्ला पार केला असून, देशभरातून त्याला ५५० वी रॅंक मिळाली आहे.
 

विजयचा जन्म अकोल्यात १० जून १९९६ रोजी झाला. वडील साहेबराव गिते मुळचे शेतकरी. खासगी नोकरीच्या निमित्ताने ते अकोल्यात स्थायीक झाले. त्यांच्या पत्नी शिलाताई गृहिनी. साहेबरावांचे शिक्षण दहावी व शिलाताईंचे सातवीपर्यंतचे. मात्र, मुलांना उच्चशिक्षित करण्याचा त्यांचा ध्यास. त्यांच्या या ध्यासातून त्यांच्या तीन मुली व एक मुलगा उच्चशिक्षित झाले. आता तर त्यांचा विजय केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भारतातून ५५० वा आला आहे. विजय हा सुरुवातापासून हुशार व अभ्यासू होता. विजयचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण अकोल्यातीलच हिंदू ज्ञानपीठ येथे झाले. डवले महाविद्यालयात त्याने बारावी उत्तीर्ण केली. त्यानंतर वडिलांच्या इच्छेनुसार तसेच मोठ्या बहिनीच्या आणि जावायांच्या मार्गदर्शनानुसार त्याने एनआयटी त्रिची येथे बी.ई. केले. २०१८ साली त्याने पदवी शिक्षण पूर्ण करून पुढील ध्येयाकडे वाटचाल सुरू केली. विजयला सुरुवातीपासून फॉरेन सर्विसेसची आवड, कुतूहल आणि वाचनाची आवड होती. त्यामुळे इंजिनिअरींगनंतर युपीएससी करायचे त्याने ठरविले. मात्र घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. अशावेळी त्याच्या मोठ्या बहिनेने व जावायांनी त्याला विश्‍वास व प्रोत्साहन देत दिल्ली येथे युपीएससी प्रिपरेशनकरिता पाठविले. याठिकाणी क्लासेस, ग्रुप डिस्कशन, वृत्तपत्र वाचन, टेस्ट सिरीज, ऑनलाइन माहिती संकलन व अभ्यास यावर विजयने ध्यान केंद्रित केले आणि त्याचे फळ म्हणून केवळ एका वर्षात व पहिल्याच प्रयत्नात त्याने देशातील सर्वोच्च परीक्षा युपीएससी उत्तीर्ण केली आहे.


‘आयएएस’ होणारच
विजयने २०१९ मध्ये पहिल्यांदाच युपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये भारतातून त्याला ५५० वी रॅंक मिळाली आहे. आता त्याला आयएएस किंवा आयपीएस सर्विस मिळू शकते. परंतु, मी आयएएस होणारच असा त्याचा निर्धार आहे. त्यामुळे यावेळी आयएएस सर्विस नाही मिळाली तरी, पुन्हा प्रयत्न करून ध्येय गाठेल असा विश्‍वास त्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.


उडी मारून पाहा, युपीएससी कठीण नाही
युपीएससी म्हणजे कठीन परीक्षा, अशी अनेकांनी भीती बाळगून ठेवली आहे. वास्तविकपणे युपीएससी कठीन परीक्षा नाहीच. त्यासाठी फक्त विश्‍वासाने, जिद्दीने, चिकाटीने अभ्यास करणे गरजेचे आहे. वृत्तपत्र वाचन, करंट अफेअर्स, ऑनलाइन माहिती संकलन, अध्ययन व योग्य मार्गदर्शनातून सहज यश मिळविता येते. शिवाय मुंबई येथे स्टेट इंन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरस् आहे व त्यांचे औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर येथे इंन्स्टिट्यूट आहेत. जे की एक परीक्षा घेऊन गुणवत्तेत पास होणाऱ्या १०० विद्यार्थांना युपीएससी परीक्षेकरिता सर्व सहकार्य करतात. त्याचा लाभ येथील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असा सल्लाही विजयने दिला.
 

हिंदू ज्ञानपीठ हे शिस्त व संस्कृतीचे प्रतीक
विजयने अकोल्यातील हिंदू ज्ञानपीठ येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, येथे शिकत असताना हिंदू संस्कृती व संस्काराचे अनमोल ज्ञान त्याला मिळाले. शिस्तप्रीय जीवन हिंदू ज्ञानपीठने शिकवले व त्याचा त्याला खऱ्या जीवनात मोठा फायदा होत असल्याचे त्याने सांगितले.
 

घे उंच भरारी
हिंदू ज्ञानपीठचे संस्थापक, संचालक चंद्रशेखर गाडगीळ, ज्येष्ठ प्राचार्या गिरीजा गाडगीळ, सहसचिव ॲड.संग्राम गाडगीळ, प्राचार्या स्वामिनी गाडगीळ, मुख्याध्यापिका ढगेकर मॅडम, परसोडकर मॅडम, कानकिरड मॅडम, अहेरकर मॅडम व शिक्षकवृंदांनी त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com