

Akot Cotton Crop
esakal
अकोट : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या पदरी पाऊस पडण्याऐवजी चिंता पडली आहे. शेतात डोलायला हवी असलेली कपाशी पाण्याअभावी कोमेजण्याच्या मार्गावर असताना, पीक वाचविण्यासाठी आता टँकरने पाणी आणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अकोट तालुक्यातील वरूर जऊळका येथील सुधाकर मधुकर वराईकर यांनी दोन एक्कर कपाशी जगविण्यासाठी चक्क सहा किलोमीटर अंतरावरून टँकरने पाणी आणण्याचा पर्याय स्वीकारला आहे. एका टँकरसाठी ८०० रुपये मोजावे लागत असल्याने पावसाच्या खंडाने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या खिशालाही मोठी झळ बसत आहे.
पीक जगविण्यासाठी पाण्याचा टँकर आणि तो आणण्यासाठी पैशांची जुळवाजुळव, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडल्याचे हे विदारक चित्र आहे. सुधाकर वराईकर यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दोन एकरावर कपाशीची लागवड केली. हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे बियाण्यांची उगवण चांगली झाली. पिकाची वाढही समाधानकारक दिसत होती. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल आणि शेतीच्या खर्चाची परतफेड होईल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, ऑगस्टपासून पावसाने दीर्घ खंड घेतल्याने या आशेवर पाणी फिरू लागले.
पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी होत गेला. कपाशीच्या वाढीसाठी पाण्याची गरज असतानाच पावसाचा खंड पडल्यामुळे पिकावर ताण निर्माण झाला. पिकाची अवस्था दिवसेंदिवस खालावत असल्याचे लक्षात आल्यानंतर वराईकर यांच्यासमोर कपाशी वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोर वाळू नये, यासाठी अखेर त्यांनी टँकरने पाणी आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते सांगतात. दोन एकरावरील कपाशी वाचविण्यासाठी सुरू असलेली धडपड ही केवळ एका शेतकऱ्याची कहाणी नसून पावसाच्या खंडावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतीसमोरील संकटाचे बोलके उदाहरण आहे.
शेतात पिकाला पाणी देण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागणे, ही परिस्थितीची गंभीरता अधोरेखित करणारी बाब आहे. एकीकडे पिके वाचविण्याची धडपड, तर दुसरीकडे वाढणारा खर्च आणि उत्पन्नाची अनिश्चितता, अशा कात्रीत शेतकरी अडकला आहे. पाऊस वेळेत पडला नाही, तर हाती आलेले पीकही हातचे जाण्याची भीती आहे. त्यामुळे वराईकर यांच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी सध्या प्रत्येक टँकर केवळ पाणी घेऊन येत नाही, तर त्यांच्या पिकाच्या अस्तित्वाची आणि संपूर्ण हंगामाच्या आशेची लढाई पुढे नेतो आहे.
वाढता खर्च आणि उत्पादनाबाबतची अनिश्चितता शेतीची मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर कामांवर आधीच खर्च झालेला असतो. अशा परिस्थितीत सिंचनासाठी स्वतंत्र व्यवस्था नसलेल्या कोरडवाहू शेतकऱ्याला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणे, हे आर्थिक संकट अधिक गडद करणारे आहे. पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची खात्री नसताना त्याच्या संगोपनासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे पीक वाचविण्याची धडपड सुरू असली, तरी वाढता खर्च आणि उत्पादनाबाबतची अनिश्चितता शेतकऱ्याची चिंता वाढवित आहे.
"ऑगस्टपासून पावसाने दडी मारल्याने कपाशी सुकण्याची भीती निर्माण झाली आहे. दोन एकरावरील पीक वाचविण्यासाठी सहा किलोमीटर अंतरावरून टँकरने पाणी आणावे लागत आहे. एका टँकरसाठी ८०० रुपये खर्च येतो. आधीच पेरणी, खते आणि मशागतीवर मोठा खर्च झाला आहे. आता पीक जगविण्यासाठीही पदरचे पैसे घालावे लागत आहेत. पाऊस पडेल की नाही, याची खात्री नाही आणि एवढा खर्च करूनही उत्पादनाची शाश्वती नाही."
- सुधाकर मधुकर वराईकर, शेतकरी, वरूर जऊळका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.