esakal | साडेसहा लाख ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम वाटपचा श्रीगणेशा!

बोलून बातमी शोधा

साडेसहा लाख ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम वाटपचा श्रीगणेशा!
साडेसहा लाख ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम वाटपचा श्रीगणेशा!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गापासून रक्षण करण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. सदर गोळ्यांचे वैद्यकीय सल्ल्यानुसार नागरिकांनी सेवन करून कोरोनापासून स्वतःचे रक्षण करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी शुक्रवारी (ता. २३) केले. त्या तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आर्सेनिक अल्बम गोळ्याच्या वाटप उद्‍घाटन कार्यक्रमात बोलत होत्या.

नोव्हेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ या रोगावर विजय मिळवण्यासाठी जगात कुठेच औषध, दवा उपलब्ध नाही. त्यापासून बचाव करण्यासाठी मूलभूत स्वच्छता राखणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याकडे देखील लक्ष देणे महत्वाचे आहे. ही बाब लक्षात घेवून प्रत्येक व्यक्ती रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या विविध प्रकारच्या पदार्थांचे सेवन करत आहे.

दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवी यासाठी जिल्हा परिषदेने नागरिकांना मोफत आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नियंत्रणात पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांच्या देखरेखीखाली ग्रामपंचायतला लोकसंख्येच्या प्रमाणात आर्सेनिक गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान सदर गोळ्या वाटपचा शुभारंभ शुक्रवारी पंचगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला. यावेळी जिप अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सावित्रीबाई राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, वंचितच्या जिल्हा अध्यक्ष प्रभाताई शिरसाट, हिरासिंग राठोड, सैफुल्ला खां पठाण व इतरांची उपस्थिती होती.
-------------------
रविवारपासून मोफत वाटप
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने ग्रामीण भागातील जनतेला आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप जिल्हा परिषदद्वारे २५ एप्रिल पासून करण्यात येणार आहे. त्याचे उद्‍घाटन जि.प. अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गोळ्यांचे वाटप करणार ग्रामसेवक करतील.

संपादन - विवेक मेतकर