esakal | 'ओ सर, नाही पडणार तुमचा विसर' गीत गाणारा मुलगा कोण आहे माहितीये का?
sakal

बोलून बातमी शोधा

aryan wagh

'ओ सर, नाही पडणार तुमचा विसर' गीत गाणारा मुलगा कोण आहे माहितीये का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सोशल मीडियाच्या युगात एखादे छोटेसे गाणे किती सुपरहिट ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण एका शाळकरी मुलाने गायलेले 'ओ सर, नाही पडणार तुमचा विसर' (ohh sir viral song) हे गीत म्हणता येईल. कोरोनावर आधारित या दीड मिनिटाच्या गाण्याची सध्या महाराष्ट्रभर चर्चा असून, आतापर्यंत तब्बल ५० लाखांच्या वर व्ह्यूज व लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा: खासदार तडस यांच्या कौटुंबिक वादात मोठा ट्विस्ट, मुलगा-सुनेचं वैदीक पद्धतीनं लग्न

खडका (जि. अकोला) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले संघदास वानखडे यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावर वरील गीत लिहिले. याच शाळेतील अकरा वर्षांचा विद्यार्थी आर्यन वाघकडून त्यांनी प्रॅक्टिस करवून घेतली आणि त्याचा मोबाईलद्वारे व्हिडिओ बनवून शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रूपवर टाकला. पाहतापाहता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. आर्यनने गायिलेले हे केवळ दीड मिनिटाचे हे गीत लोकांना खूप आवडले. अनेकांनी ते व्हाट्सअप, फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून शेअर केले. या गाण्याला आतापर्यंत यूट्यूबसह बीईंग मराठी, चला हवा येऊ द्या या फेसबुक पेजवर ५० लाखांच्या वर व्ह्यूज व लाईक्स मिळाले असून, हजारोंनी शेअर केले आहे. साम टीव्हीसह अनेक मराठी वाहिन्यांनी या लोकप्रिय गाण्याची दाल घेतल्याची माहिती गीतकार संघदास वानखडे यांनी दिली.

सुप्रसिद्ध गायक उमेश गवळीने गायिलेल्या 'ओ शेठ'च्या धर्तीवर बनविण्यात आलेल्या या गाण्याची केवळ अकोल्यातच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खेड्यापाड्यातील मुलांच्या ओठावर हे एकच गाणे आहे. या गाण्यानंतर सहाव्या इयत्तेत शिकणारा आर्यनही एका रात्रीत सुपरस्टार झाला आहे. त्याच्या शाळेत त्याला एकप्रकारे सेलिब्रिटी स्टेटस मिळाले आहे. अनेक चॅनेल्सनी आर्यन व गीतकार वानखडे यांना ठळकपणे प्रसिद्धी दिली आहे. या गाण्याची पार्श्वभूमी सांगताना वानखडे म्हणाले, शाळेतील मुले मला आपुलकीने 'ओ सर' असे संबोधतात. या टोनवर आधारित एखादे गीत लिहावे, असा विचार माझ्या मनात आला. सध्या कोरोनाचे वातावरण असल्यामुळे, मी गाण्यासाठी हा विषय घेतला. सुदैवाने गीत सुपरहिट ठरले. या गाण्याला इतकी लोकप्रियता मिळेल, असा मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता, असे वानखडे म्हणाले. वानखडे यांनी अलीकडेच शाळेतील मुलांवर 'सालस' नावाचा मराठी चित्रपट बनवला आहे, हे उल्लेखनीय.

वानखडे सरांनी कोरोनावर गीत लिहिल्यानंतर मला म्हणायला लावले. माझ्याकडून त्यांनी काही दिवस प्रॅक्टिस करवून घेतल्यानंतर गाण्याचा व्हिडिओ बनवला. मी म्हटलेले हे गाणे लोकांना खूप आवडले. या गाण्यानंतर शाळेतील सर्वच जण मला ओळखू लागले आहेत. गाण्याच्या निमित्ताने का होईना मी चर्चेत आलो, याचा मला आनंद आहे.
-आर्यन वाघ, गायक विद्यार्थी
loading image
go to top