सिनेस्टाईल दारूची बॉटल फोडून उत्पादन शुल्क अधिकाऱ्यावर हल्ला | Attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bottle Attack
सिनेस्टाईल दारूची बॉटल फोडून उत्पादन शुल्क अधिकाऱ्यावर हल्ला

सिनेस्टाईल दारूची बॉटल फोडून उत्पादन शुल्क अधिकाऱ्यावर हल्ला

देऊळगाव राजा - धाब्यावर अवैध दारू विक्री संदर्भात कारवाई करणाऱ्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यावर दारू विक्रेत्याने हल्ला चढवून एकास जखमी केल्याची घटना आज (ता. २०) तालुक्यातील देऊळगाव मही येथे घडली. आरोपी दारू विक्रेत्याने सिनेस्टाईल दारूची बॉटल फोडून दारूबंदी पथकातील कर्मचाऱ्यावर हल्ला करून जखमी केले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी बुलढाणा कारागृहात केली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, देऊळगाव मही येथील निसर्ग हॉटेल वर अवैध देशी दारू विक्री होत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज दुपारी सदर हॉटेलवर छापा टाकून दारूबंदी कायद्या अंतर्गत कारवाई सुरू केली. सदर कायदेशीर कारवाई सुरू असताना आरोपी हा त्याचे हातात लोखंडी पाइप घेऊन आला व उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रकाश मुंगडे यांना शिवीगाळ करीत लोटपाट केली. एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दारूची बॉटल फोडून दुय्यम निरीक्षक यांच्या सोबत असलेल्या साक्षीदार कर्मचारी विशालसिंह पाटील यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने अंगावर धावून सदर कर्मचार्‍याच्या हातावर फुटलेली बॉटल मारून जखमी केले. व फिर्यादी व साक्षीदार शासकीय कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोटून दिले. व माझ्याविरुद्ध कारवाई करत असाल तर तुम्हाला जीवाने मारून टाकू, अशी धमकी दिली.

हेही वाचा: अकोला : वंचितचे पारडे जड; दोन सभापतींची निवड सोमवारी

सदर प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग बुलढाणा येथील दुय्यम निरीक्षक प्रकाश वीरभद्र मुंगडे वय 42 यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमोल तेजराव शिंगणे वय 32 राहणार देऊळगाव मही याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा करून सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने सदर आरोपीची बुलढाणा कारागृहात रवानगी केली. सदर प्रकरणात ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे तपास करीत आहे.

पोलीस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारूबंदीची जबाबदारी असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हापथक कधीतरी एखाद्या वेळी तालुक्यात येऊन थातूरमातूर तपासणी करून जातात. परिणामी, तालुक्यात पोलिसांच्या नजरेआड लपून छपून अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर उत्पादन शुल्क विभागाचे वचक राहिले नाही. त्यातूनच आज अवैध दारू विक्री त्याने शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली.

loading image
go to top