अकोला : वंचितचे पारडे जड; दोन सभापतींची निवड सोमवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

अकोला : वंचितचे पारडे जड; दोन सभापतींची निवड सोमवारी

अकोला : जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या उपसभापतींची निवडणूक आटोपल्यानंतर आता अकोला व तेल्हारा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. दोन्ही सभापती पदासाठी वंचित बहुजन आघाडीचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. २० सदस्य संख्या असलेल्या अकोला पंचायत समितीमध्ये वंचितचे ११ तर तेल्हारा पंचायत समितीमधील १६ पैकी ९ सदस्य वंचितचे आहेत. तर कॉंग्रेसच्या पंचायत समिती सदस्य उज्ज्वला काळपांडे यांनी गुरुवारीच (ता. १८) वंचितमध्ये प्रवेश केल्याने आता वंचितची सदस्य संख्या दहा झाली आहे. त्यामुळे दोन्ही पंचायत समितीवर वंचितचा झेंडा फडकणार आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांसह ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या इतर सदस्यांचे पद रिक्त झाले होते. त्यामुळे पोटनिवडणूक घेवून नामाप्र अर्थात ओबीसीच्या प्रवर्गासाठी राखीव जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात आल्या. दरम्यान पोटनिवडणुकीनंतर तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या सभापतींची निवड कोणत्या प्रवर्गातून करण्यात यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते.

सदर पदी नामाप्र उमेदवारांची निवड करण्यात यावी यासंबंधीचे आदेश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या सभापतींचे पद नामाप्र प्रवर्गातून भरण्यात येतील. तेल्हारा मधील सभापतीचे पद नामाप्र स्त्री तर अकोला येथील सभापतीचे पद नामाप्र मधून भरण्यात येईल.

हेही वाचा: Nashik | दोन्ही आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्यात खडाजंगी

यासंबंधीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी २२ नोव्हेंबर रोजी संंबंधित पंचायत समितीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडेल. त्यानंतर दुपारी ३ वाजता सभापती पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. अकोला व तेल्हारा पंचायत समितीमध्ये वंचितकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ असल्याने दोन्ही पंचायत समितीवर वंचितचा झेंडा फडकणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

हेही वाचा: अकोला : पोलिस अधीक्षकांकडून रात्री संचारबंदीची निगराणी!

असे आहे पंचायत समितीचे बलाबल

- अकोला :- पंचायत समिती पोटनिवडणुकीत वंचितांचे एकूण तीन सदस्य निवडून आले. एकूण २० सदस्यांपैकी पैकी ११ वंचितचे सदस्य आहेत. त्यामुळे सभापती पुन्हा वंचितचाच हाेणार आहे. उपसभापती पदी सुद्धा वंचितच्या उमेदवाराची निवड करण्यात आली.

- तेल्हारा :- पंचायत समितीमध्ये पोटनिवडणुकीत वंचितचे ३ सदस्य विजयी झाले. त्यामुळे १६ पैकी ९ सदस्य वंचितचे झाले आहेत. नामाप्र स्त्री साठी पद रिक्त असल्याने कॉंग्रेसच्या एकमात्र सदस्या उज्ज्वला काळपांडे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे याठिकाणीही वंचितचेच सभापती होणार आहेत.

loading image
go to top