ठरलं तर! ‘पांढऱ्या हत्ती’साठी भाजप असे करणार आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वच स्तरावर दक्षता घेतली जात आहे. परंतु रुग्णांच्या सुविधेसाठी दीडशे कोटी रुपये खर्च करुन जिल्ह्यात तयार होत असलेले सुपर स्पेशलिटी रुग्णालय या महामारीच्या काळात कोरोनाग्रस्तांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. हा जिल्ह्यातील रुग्णांवर अन्याय असून याविषयी भारतीय जनता पार्टी अभिनव पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या विषयी ‘सकाळ’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. 

अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वच स्तरावर दक्षता घेतली जात आहे. परंतु रुग्णांच्या सुविधेसाठी दीडशे कोटी रुपये खर्च करुन जिल्ह्यात तयार होत असलेले सुपर स्पेशलिटी रुग्णालय या महामारीच्या काळात कोरोनाग्रस्तांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. हा जिल्ह्यातील रुग्णांवर अन्याय असून याविषयी भारतीय जनता पार्टी अभिनव पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या विषयी ‘सकाळ’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. 

रुग्णांना योग्य दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत  अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. सदर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी केंद्रीय राज्यमंत्री संजयभाऊ धोत्रे यांनी केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणला, परंतु कोविड-19 च्या महामारीच्या काळात राज्य सरकार सुपर स्पेशलिटी रुग्णालयात विद्युत व्यवस्था व हॉस्पिटलसाठी मंजूर जागा भरत नाही. हा रुग्णांसह विदर्भावर अन्याय आहे. परिणामी या विषयी भाजपा अभिनव पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात जेष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महापौर अर्चना मसने, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, अकोटचे नगरध्यक्ष हरिनारायण माकोडे, तेल्हारा नगरध्यक्षा जयश्री पुंडकर, मूर्तिजापूरच्या मोनिका गावंडे, जिल्हा परिषद भाजपा गट नेत्या माया कावरे, तेजराव थोरात, किशोर पाटील, उपमहापौर राजेंद्र गिरी व इतरांनी दिला आहे.

तीन महिन्यांपासून पत्रव्यवहार
केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे राज्य शासनाकडे गत तीन महिन्यांपासून सतत पत्रव्यवहार करत असून अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची कामे पूर्ण करून व रिक्त जागा भरण्यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी शासनाकडे करत आहे. परंतु मागणी मान्य होत नसल्याने विदर्भावर भेदभाव होत असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. विदर्भात अकोल्यात सर्वात जास्त कोव्हीड-19 चे रुग्ण असताना सुद्धा भेदभाव का करण्यात येत आहे, असा सवाल जिल्हाध्यक्ष व आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will agitate in akola for white elephant