esakal | बुलडाणा : चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
sakal

बोलून बातमी शोधा

buldana

बुलडाणा : चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : स्थानिक गुन्हे शाखेने संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात चोरीच्‍या दुचाकी विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून बुलडाणा येथील पथकाने आदिवासी ग्राम वसाली येथे कारवाई करीत दोन आरोपींना अटक केली आहे.

परप्रांतातून चोरी करून येथे विक्री करण्यात आलेल्या दुचाकींचा शोध घेत एक ट्रॅक्टर व तब्बल २१ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एन.एस. शेळके पथकासह गेल्या तीन दिवसांपासून आदिवासी भागात ठाण मांडून होते.

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी ग्राम वसाली येथे परप्रांतातून चोरी करून कमी किंमतीत दुचाकींची विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आदिवासी ग्राम वसाली येथे चोरीच्या दुचाकीची शोध मोहीम राबवली. यामध्ये तब्बल २१ दुचाकींसह एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून वसाली येथील आरोपी राकेश जमरा, सुनिल मुजाल्दा या दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: इंदापूर: तक्रार निवारण दिनी ६६ तंटे मिटविण्यात पोलिसांना यश

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत मोठे मासे गळाला लागतील असे चित्र दिसत होते. मात्र, सध्यातरी स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांवरच कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, वसाली येथील आरोपींची कसून चौकशी केली असता मध्यप्रदेशातील मुख्य दोन फरार आरोपींच्या मदतीने दुचाकी चोरी करून ग्राम वसाली, निमखेडी, टूनकी व सोनाळा येथील काही नागरिकांना कमिशनने विकत होते. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर व दुचाकींच्या अभिलेखाची तपासणी केली असता महाराष्ट्रातील बीड, नंदुरबार जिल्हा, तसेच गुजरात, मध्यप्रदेश राज्यात ट्रॅक्टरसह दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: मुंबई : सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी

आरोपी सुनिल मुजाल्दा व राकेश जामरा या दोन्ही आरोपींनी धाड पोलिस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरल्या असल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांना धाड पोलिसांनी अटक केली आहे. वसाली येथे करण्यात आलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर व दुचाकी मंगळवारी रात्री उशीरा सोनाळा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्‍या. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावारीया, अप्पर पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, संजय नागवे, दिनेश बकाले, गणेश पाटील, गजानन गोरले, सुरेश भिसे, सचिन जाधव यांनी केली आहे.

loading image
go to top