esakal | २० दिवसांत २० टक्के लसीकरणाचे आव्हान !
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

२० दिवसांत २० टक्के लसीकरणाचे आव्हान !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना (Corona) विषाणूची संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी जिल्ह्यात ८ ते १४ ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवून अधिकाधिक लसीकरण करण्याचे प्रयत्न आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत. या अभियानात जिल्ह्यात दररोज २० हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून ऑक्टोबर महिन्या अखेरपर्यंत लसीकरणाच्या टक्केवारीत २० टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे. त्यानुसार अद्याप पहिला डोस न घेणाऱ्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली करण्यात आली. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अधिक प्रमाणात नागरिक कोरोनाची लस घेत आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी अद्याप कोरोनाची लस न घेतल्याने आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक गतीने करण्याचे अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार आगामी १४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कवच कुंडल अभियान राबवण्यात येत असून त्यानंतर सुद्धा ऑक्टोबर महिनाअखेर पर्यंत २० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: ठाण्यातील पाच लाख नागरिकांना सात-बारा घरपोच

२१ टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील २१ टक्के नागरिकांनीच कोरोनाची लस घेतली आहे. त्यांची संख्या ३ लाख १३ हजार ११६ आहे. येणाऱ्या काळात ९० हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी सुद्धा आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे.

हेही वाचा: पोस्टल सप्ताहाद्वारे योजनांची नागरिकांना होणार ओळख

असे आहे लसीकरणाचे उद्दिष्ट

एकूण उद्दिष्ट - १४ लाख ३३ हजार

पहिला डोस - ६ लाख ६६ हजार ०१३ (४६ टक्के)

दुसरा डोस - ३ लाख १३ हजार ११६ (२१ टक्के)

पहिला डोस बाकी - ७ लाख ६६ हजार ९८७

ऑक्टोबर महिन्या अखेर जिल्ह्यात २० टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला.

loading image
go to top