esakal | प्रशासनाच्या बेपरवाईने बेशरमही लाजली; नागरिक लोळले चिखलात
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासनाच्या बेपरवाईने बेशरमही लाजली; नागरिक लोळले चिखलात

प्रशासनाच्या बेपरवाईने बेशरमही लाजली; नागरिक लोळले चिखलात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

प्रभाकर पाटील
रिसोड ः जिल्ह्याची राजकीय राजधानी, आजी माजी आमदार खासदारांची कर्मभूमी, माजी मंत्र्यांचे माहेर, अशी ओळख असलेल्या रिसोड शहरात आज नागरिकांनी खड्ड्यात लावलेली ‘बेशरम’ही लाजली. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या सिव्हील लाईन्स रस्त्याची दुरावस्था दूर होत नसल्याने नागरिकांनी चिखलात लोळून बेशरम लावण्याचे आंदोलन केले. मात्र, प्रशासनाची बेपरवाई शिरजोर तर, लोकप्रतिनिधी कमजोर, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने रिसोडकरांच्या भाळी चिखलस्नानाची पर्वणी कायमच राहणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय साठमारीत जनता बेजार झाली असताना या लोकप्रतिनिधींनकडून एक रस्ता दोन वर्षात पूर्ण होवू नये यापेक्षा मोठे दुर्दैव नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (Citizens rolled in the mud, the townspeople shouted agitation)

हेही वाचा: अकोला बाजार समितीत लाखोंचा गैरव्यवहार - शेतकरी जागर मंच

येथील सिव्हील लाईन रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याच्या बांधकामासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा सर्पमित्र अनंता देशमुख यांनी बेमुदत उपोषण केले होते. आश्वासन देऊनही काम न झाल्यामुळे सोमवारी (ता.१२) एक किमीच्या या संपूर्ण रस्त्यावर वाजत गाजत वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलकांना काही काळ पोलिसांनी स्थानबद्ध करून मुक्तता करण्यात आली. वारंवार मागणी, आंदोलन, बेमुदत उपोषण करूनही आजपर्यंत काम झालेले नाही. २७ जानेवारी २०२१ ला सामाजिक कार्यकर्ते तथा सर्पमित्र अनंता देशमुख यांनी बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १५ मार्चपर्यंत या रस्त्याचे काम केल्या जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते.

मात्र, चार महिन्याचा कालावधी उलटूनही रस्त्याचे काम झाले नाही. उलट हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. तात्पूरती उपाययोजना म्हणून बांधकाम विभागाने रस्त्यावर मुरूम टाकला आहे. पावसामुळे या मुरमाची माती होऊन रस्ता अधिकच त्रासदायक झाला आहे. टेंडर व इतर प्रक्रिया पूर्ण होऊनही बांधकाम का केले जात नाही हे एक न उलगडणारे कोडे आहे. हा शहराचा मुख्य रस्ता असून, या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा होती. आज रोजी या मुख्य रस्त्याला नाल्याचे रूप आले असून, नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. १२ जुलै रोजी या रस्त्यावर वाजत गाजत बेशरमीचे झाडे लावून सार्वजनिक बांधकामाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. आंदोलनातील काही तरुणांनी तर या रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात पोहून निषेध व्यक्त केला. संपूर्ण एक किलोमीटरच्या रस्त्यावर बेशरमीचे झाडे लावण्यात आले. या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा सर्पमित्र अनंता देशमुख व अन्य आंदोलकांना पोलिसांनी काही काळ स्थानबद्ध केले होते तरीही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण केले. यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी या रस्त्याबद्दल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दहा कोटीचा रस्ता, पण होणार कधी?
रिसोड सिव्हिल लाईन रस्त्यासाठी मार्च महिन्यातच दहा कोटी रूपये मंजूर झाले होते निविदा झाली. कंत्राटदार नेमला मात्र, राजकिय साठमारीत कार्यारंभ आदेश देण्यात आला नाही. या प्रकाराने गेल्या दोन वर्षांपासून मरणयातना भोगणाऱ्या शहरवासींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम झाले. प्रशासकिय यंत्रणाही राजकीय दवाबात काम करते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


Citizens rolled in the mud, the townspeople shouted agitation

loading image