लॉकडाउन गेला उडत, दुकाने बाहेर बंद; आत सुरू

सुगत खाडे  
Monday, 10 August 2020

कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आॅगस्ट महिन्याच्या प्रत्येक रविवारी जिल्ह्यात एक दिवसाची संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत. रविवारी (ता. ९) टाळेबंदीच्या दिवसी शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने, प्रतिष्ठाने बंद होती; परंतु रहिवाशी क्षेत्रातील दुकानांसह याच भागातील गल्ली-बोळीतील दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.

अकोला ः कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आॅगस्ट महिन्याच्या प्रत्येक रविवारी जिल्ह्यात एक दिवसाची संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत. रविवारी (ता. ९) टाळेबंदीच्या दिवसी शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने, प्रतिष्ठाने बंद होती; परंतु रहिवाशी क्षेत्रातील दुकानांसह याच भागातील गल्ली-बोळीतील दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.

संपूर्ण टाळेबंदीच्या काळात रस्त्यांवर पोलिसांची उपस्थिती नगण्य असल्याने वाहन चालक सुद्धा बिनधास्त फिरताना दिसून आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोना विषाणू विरोधात लढाईला अधिक तीव्र करण्यासाठी जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या प्रत्येक रविवारी संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आॅगस्टच्या प्रत्येक रविवारी म्हणजेच ९, १६ व २३ आॅगस्टरोजी जिल्ह्यात संपूर्ण टाळेबंदी लागू राहिल.

दरम्यान रविवारी (ता. ९) टाळेबंदीच्या काळात महानगरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून टाळेबंदीचे पालन केले. भाजी बाजार सुद्धा सकाळपासूनच निर्मनुष्य होता. त्यामुळे नेहमीच वर्दळ असणाऱ्या गांधी रोड, तिलक रोड, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प रोडसह शहरातील इतर रस्त्यांवर सुद्धा शुकशुकाट होता.

काही चौकांमध्ये मात्र युवकांचे टोळके दिसून आले. याव्यतिरीक्त रहिवाशी क्षेत्राताली दुकाने सकाळपासूनच सुरू होती. त्यामुळे गल्ली-बोळीतील दुकानांमध्ये ग्राहक खरेदी करताना दिसून आले. याव्यतिरीक्त रस्त्यांसह चौकाचौकात पोलिस तैनात नसल्याने मुख्य रस्तांवर वाहन चालक सुद्धा कोणाचीही भीती न बाळगता निर्धास्त फिरताना दिसून आले. त्यामुळे रविवारची टाळेबंदी ही प्रशासनाने नागरिकांच्याच भरवश्यावर सोडण्यात आल्याचे दिसून आले. टाळेबंदीच्या काळात औषध दुकाने व दवाखाने मात्र सुरळीत सुरू होते.
 
‘स्ट्रीट मार्केट’ बंदच
महानगरात प्रत्येक रविवारी तिलक रोड, जुना थोक किराणा बाजार, मोहम्मद अली रोडसह इतर लहान-मोठ्या रस्त्यांवर स्ट्रीट मार्केट भरत असते. याठिकाणी कपड्यांसह स्वस्तात इलेक्ट्रॉनिकचे सामान व भंगारातील साहित्याची विक्री करण्यात येते. काही विशिष्ट नागरिक या बाजारात खरेदी सुद्धा करतात. परंतु संपूर्ण टाळेबंदीच्या तीन महिन्यात सदर बाजार बंद होता; तर आता प्रत्येक रविवारी हा बाजार बंद राहत असल्याने हा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे ग्राहकांना सुद्धा स्वस्तातील खरेदीला मुकावे लागत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collectors lockdown in Akola, shops closed outside; Start inside