काळाच्या ओघात गोंधळ कला लोप पावतीय; कोरोना संसर्गानेही बसला कलावंतांना फटका

Corona has shut down the work of artists who have been doing confusing events.jpg
Corona has shut down the work of artists who have been doing confusing events.jpg

साखरखेर्डा (बुलडाणा) : खेड्यात जन्मलेली जुन्या काळातील करमणूक प्रधान व वीररसयुक्त अनेक लोककला लोप पावत असताना अजूनही काही लोककला त्या जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. शिवकालीन अथवा त्यापूर्वीच्याही काळात पोवाडे, आईचा गोंधळ, कलापथक, दंड्यार, सोंगे, तमाशा आदी कलांच्या माध्यमातून जनमानसात जोश भरण्याबरोबरच करमणूक व मनोरंजनसुद्धा होत असायचे.

यंदाची धुईमाती बी मातीत जाईन काहो बा? कोरोनाच्या निर्बंधांमुळे तरुणांचा हिरमोड तर रंग विक्रेते संकटात
 
तमाशातील गण, गौळण करमणूक प्रधान असायचे; परंतु, तमाशा कलावंतांनी सादर केलेले वगनाट्यही आजच्या काळातील कोणत्याही चित्रपट कलाकारापेक्षा निश्‍चितच उच्च दर्जाचे व परिपूर्ण मनोरंजक करणारे तथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे होते. अलीकडच्या काळात ती जागा नाटकांनी घेतली. तरीसुद्धा तत्कालीन कलांची सर येत नाही. यातीलच एक कला म्हणजे भवानी आईसमोर घातला जाणारा आईचा गोंधळ. 

गत काळात अंबाभवानीसमोर अंबा भवानीच्या कृपेसाठी गोंधळ घातला जात असे. कोणतेही कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी आईसमोर गोंधळ घालून आई भवानीला साकडे घातले जात असे. त्यासाठी रात्रभर तेल जाळून जागरण केले जायचे. पूर्वीच्या काळात नवरी मुलगी आणण्यासाठी वर पक्षाची वर्‍हाडी मंडळी जेव्हा बैलगाडी, घोड्यावरून जात असतं तेव्हा रस्त्याने त्यांना मोगली सैनिक अडवून त्रास देत असतं, त्यांना लुटत असतं. म्हणून लग्न समारंभ आदी कार्ये निर्विघ्नपणे, सुखरूपपणे व आनंदाने पार पडण्यासाठी, आई भवानी माझ्या मुला-मुलीचे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे, मी तुझ्या समोर गोंधळ घालीन. रात्रभर जागरण करीन. मणभर तेल जाळीन, असा संकल्प सोडीत. भवानीआईला गोंधळ घालून आर्जव केले जात असे. खंडेरायाच्या आराधनेसाठीही गोंधळ घातला जात असे व सध्या ही घातला जातो. 

नवरात्राच्या काळात तुळजाभवानी मंदिरात आईभवानीसमोर नऊही रात्रंदिवस गोंधळ घालून जागरण करतात. आजच्या काळात हा कार्यक्रम करण्यासाठी त्यांना गोंधळी कलाकार मिळतील की नाही अशी शक्यता वाटत असताना त्यांना ग्राम सोनोशी येथील नाथपंथीय गोंधळी भगवान काशिनाथ धायडे यांनी गोंधळ ही कला अजूनही जिवंत ठेवली आहे. त्यांनी या कलेचा वारसा मुले गणेश भगवान धायडे व शिवनाथ भगवान धायडे यांना दिला. त्यांना हा वारसा पिढीजात पूर्वजांकडून मिळाला असून विद्यमान पिढी तो समर्थपणे चालवीत आहे. पंढरीनाथ उगले यांनी गणेश धायडे व शिवनाथ धायडेंना आईसमोर गोंधळ घालण्याची सुपारी दिली. 

धायडे बंधूंनी पांग्री उगले येथे सोपान उगले यांच्या लग्नानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळून मोजक्याच घरच्या मंडळींसह आईसमोर गोंधळ करून पंढरीनाथ उगले यांनी आपला संकल्प पूर्ण केला. त्यांनी समाज सुधारणा व जनजागृतीसाठी दारूबंदी, हुंडाबळी, ग्रामस्वच्छता मोहीम अशा अभियानाचे रूप दिले असून जनजागृतीचे काम करून या कलेला जिवंत ठेवले आहे. शिवकालीन ही गोंधळ कला त्यातील संगीत, गायन व ऐतिहासिक कथेच्या संगीतमय सादरीकरणामुळे निश्‍चितच मनोरंजक आहे. ही ऐतिहासिक कला जिवंत ठेवून नवीन स्वरूपात पुढे नेण्याचे काम गणेश धावडे आणि त्यांचे कुटुंबीय करतात हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे. 

शासनाने मानधन द्यावे 

कला जिवंत ठेवण्यासाठी इतर कलाकार वा शाहिरांप्रमाणे आम्हा गोंधळी कलाकारांनाही शासनाने मानधन देऊन आर्थिक साहाय्य करावे, अशी अपेक्षा भगवान धायडे, गणेश भगवान धायडे व शिवनाथ भगवान धायडे या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com