कोरोना उपचारात खासगी रुग्णालयांची झाली चांदी, दोन्हीकडून काढले बिलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना उपचारात खासगी रुग्णालयांची चांदी, दोन्हीकडून काढले बिलं

कोरोना उपचारात खासगी रुग्णालयांची चांदी, दोन्हीकडून काढले बिलं

वाशीम ः कोविडच्या दुसऱ्या लाटेत अनेक खासगी रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार झाले होते. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले, मात्र याच काळात जिल्ह्यातील काही खासगी कोविड केअर सेंटर मध्ये आपत्तीत संधी शोधून रुग्ण व शासनाची लुबाडणूक करण्याचे प्रकार घडले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी झाली, तर हा गोरखधंदा उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Corona treatment is taken from patients by private hospitals)


कोविडच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रुग्णसंख्या कमालीची वाढली होती. शासकीय कोविड केअर सेंटर व्यतिरिक्त अनेक खासगी कोविड केअर सेंटरला मान्यता देण्यात आल्या, यामध्ये अनेक रुग्णांकडून रुग्णांवर उपचार होवून रुग्ण बरे झाले. यामध्ये अनेक डाॅक्टरांनी प्रयत्नाची पराकाष्टा केली, मात्र या कठीण काळातही काही रुग्णालयांनी कोविड ‘काळ’ पैसे कमाविण्याच्या संधीत रुपांतरीत केला. आधी रुग्ण दाखल झाल्यानंतर अग्रीम रक्कम मागीतली गेली. सर्व तपासण्या रुग्णांच्या खर्चातून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर रुग्ण महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा पंतप्रधान जनआरोग्य योजनेत समाविष्ट केला. जेव्हा रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी झाली तेव्हा ना अग्रीम परत मिळाले ना केलेला खर्च परत मिळाला, मात्र सदर रुग्णालयाने जनआरोग्य योजनेतून लाखो रुपये उकळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये वाशीम शहरातील काही रुग्णालयांचा समावेश आहे. या योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांची त्याच्या देयकाची स्वतंत्र चौकशी केली, तर यामध्ये मोठी फसवणूक करणारी साखळी उघडकीस येण्याची शक्यता जनतेमधून व्यक्त होत आहे.

अशी होते फसवणूक
रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दाखल अर्जावर नातेवाईकांची स्वाक्षरी घेतली जाते. ही प्रक्रिया वैद्यकीय क्षेत्रात रुढ आहे, मात्र याच कागदासोबत जनआरोग्य योजनेच्या फार्मवरही स्वाक्षरी घेतली जाते. जनआरोग्य योजनेचे निरीक्षकही याबाबत अनभिज्ञ असतात, नंतर रुग्णांकडून अगावू रक्कम मागीतली जाते, याची कोणतीही पावती दिली जात नाही. तपासण्या करण्यासाठी रुग्णांचा खर्च होतो, मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जनआरोग्य योजनेची माहिती रुग्णांच्या नातेवाईकाला दिली जाते. दवाखान्याचे बिल सरकार भरत आहे या आनंदात रुग्णांचे नातेवाईक इतर चौकशी करत नाहीत, येथूनच सरकारला लुटीचा खेळ सुरू होतो. अग्रीम रक्कम व झालेला खर्च लाखाच्या घरात जावूनही तो परत दिला जात नाही.

अशी आहे योजना
महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेमधे रुग्णाचा समावेश झाल्यानंतर नियमानुसार रकमेपर्यंत सर्व तपासण्या, औषधोपचार व जेवण तसेच सुट्टी झाल्यानंतर भाड्याची व्यवस्था या योजनेत समाविष्ट आहे, मात्र नियमाचे पालन होत नाही ही शोकांतिकाच आहे.

Corona treatment is taken from patients by private hospitals

टॅग्स :CoronavirusWashim