
तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील आरोग्य केंद्रातील मुदत संपलेली औषधी नष्ट न करता आरोग्य केंद्राच्या आवारत फेकण्यात आल्याने नागरिकांसह पशूंचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दानापूर (वाशीम) : आरोग्य विभागाचा बेधुंद कारभार ऐरणीवर आला आहे. तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील आरोग्य केंद्रातील मुदत संपलेली औषधी नष्ट न करता आरोग्य केंद्राच्या आवारत फेकण्यात आल्याने नागरिकांसह पशूंचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्य केंद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात मुदत संपलेल्या औषधी साठा जमा झाला कसा. असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. प्रशासनाने वेळकाढू धोरण अवलंबत सर्वसामान्य नागरिकांना औषधी पुरवठा केला नसल्याचा धक्कादायक प्रकार यावरून उघडकीस आला आहे.
हे ही वाचा : नवीन पिढीवर संगणकाचा प्रभाव, डिजिटल शिक्षणात हरवतेय हस्ताक्षराची कला
सध्या स्थिती वैश्विक महामारी सह डेंगू तथा टायफेट आजाराची साथ सुरू आहे. या जीवघेण्या आजारांमुळे नागरिक त्रस्त असतांना प्राथमिक आरोग्याकडून करण्यात आलेला प्रकार सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतवणारा ठरणार आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. झांम्बरकर यांच्या अरेरावीची वागणूकीला नागरिक अक्षरशः वैतागले असून 'हम करे सो कायदा' याप्रमाणे येथील कारभार सुरू आहे. शासनाकडून गोरगरीब रुग्णांसाठी औषधांचा पुरवठा करण्यात येत असून सर्वसामान्यांना मोफत औषधी देऊन नागरिकांचे आरोग्य ठणठणीत ठेवण्याचे शासनाचे उद्देश आहे. मात्र या उद्देशाला दानापूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने हरताळ फासली आहे.
हे ही वाचा : अभियंत्यांस हातात फलक देऊन केले खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन
रुग्णांना औषधांचा पुरवठा न करता औषधांची मुदत संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने येथील आरोग्य केंद्राचा कारभार संशयाच्या भोव-यात सापडला आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याला विचारणा केली असता. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. तर त्यांच्याकडून रुग्णांना अरेरावीची वागणूक मिळत असल्याने रुग्णांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 'आंधळ दळत कुत्र पीठ खाते' असा प्रकार दानापूर येथील आरोग्य केंद्रात सुरू आहे.
रुग्णांना हक्काचे औषध न देता त्या औषधांची मुदत संपवून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्यात येत आहे. रुग्णांना औषधांपासून वंचित ठेवून वेठीस पकडण्यात येते. तर दुसरीकडे मुदत संपलेले औषधे नष्ट न करता औषधे फेकून देण्यात येत असल्याने आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले हेवे दावे फोल ठरले आहे. या गंभीर प्रकारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
औषध निर्मात्याचे पद रिक्त
गत अनेक दिवसांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्मात्याचे पद रिक्त असल्याने औषधी वाटपात अडचणी निर्माण झाले आहेत. सदर प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनास्तरावरून कायम दुर्लक्षित असल्याने येथील कारभार रामभरोसे सुरू आहे.
दानापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ सूजाता भिमकर म्हणाल्या, मुदत संपलेले औषधे नष्ट करण्याचे आदेश दिले आहे. औषधे बाजूला काढण्यात आले असून रस्त्यावर फेकण्यात आले नाही. तरी याबाबत चौकशी करण्यात येईल.
संपादन - सुस्मिता वडतिले