Akola News : ‘कुणी घर देता का घर’! सिरसो येथील निराधार वृद्ध महिलेचा टाहो

पतीच्या निधनानंतर तळहातावर जगविलेली दोन मुलंही जग सोडून गेली
does someone give a house old woman from Sirso need help akola
does someone give a house old woman from Sirso need help akolaSakal

- निलेश मेहरे

सिरसो : पतीच्या निधनानंतर तळहातावर जगविलेली दोन मुलंही जग सोडून गेली. ना कुणाचा आधार, ना रहायला धड घर. अशा परिस्थितीत अनाथ नातवासोबत जीवन व्यथीत करीत असलेल्या सिरसो येथील निराधार महिलेने, ‘कुणी घर देता का घर’ असा टाहो फोडला आहे. मात्र, निगरगट्टा प्रशासन कानावर हात देवून बसल्याने त्यांचा आवाज कुणाच्याही कानावर पडत नाही.

मुले लहान असतानाच पतीचा अचानक मृत्यू झाला. दररोज मोलमजुरी करून मुलांचे संगोपन करीत असताना ऐन तारुण्यात असताना दोन मुलांचा देखील मृत्यू झाला. घरी कुठलाही जमीन जुमला नाही, प्रॉपर्टी नाही.

एका छोट्याशा झोपडीमध्ये वर्षानुवर्षांपासून आई-वडील व नातवासोबत अगतिक आयुष्य ती जगते आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना फक्त मजुरी करून या वयातही जिद्दीने आपल्या अनाथ नातवाचे पालन पोषण करते आहे.

ही कुठलीही कहानी नसून, सिरसो प्लॉट येथील चंद्रकलाबाई महादेवराव दांदडे या निराधार, वृद्ध, विधवा महिलेच्या आयुष्यातील भीषण वास्तव आहे. सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना आता तर ज्या झोपडीत वर्षानुवर्षे राहत आली ती झोपडी देखील साथ सोडून जाण्याच्या मार्गावर आहे.

तिची राहते घर रात्री अपरात्री केव्हा अंगावर पडेल काही सांगता येत नाही. त्यामुळे एक वर्षांपूर्वी यवतमाळ येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेमध्ये त्या निराधार महिलेचे घर अंगावर कोसळून तिचा मृत्यू झाला होता.

गेले अनेक दिवसांपासून चंद्रकलाबाई दांदडे आपल्याला घरकुल मिळावे यासाठी ग्रामपंचायत व तालुक्यातील कचऱ्यांची पायपीट करीत आहे. पाठीशी सहकार्य करायला कुणी नाही. यामध्ये मजुरी करून पोट भरायचे की घरकुलासाठी कचऱ्यांमध्ये चकरा मारायच्या असा यक्ष प्रश्न तिला पडला आहे.

चंद्रकलाबाईंचे आयुष्य जरी संपत आले असले तरी आपल्या नातवासाठी घर व्हावे असे तिला सतत वाटत असते. तिच्या नातवाकडे पाहून बरेचदा तिला गहिवरून येते. त्यामुळे घर देता का कुणी घर असा अर्थ टाहो चंद्रकलाबाई करीत आहे.

परंतु, स्थानिक शासन प्रशासन मात्र या गंभीर विषयाची दखल घेत नाही. माझ्या जीव गेला तरी चालेल, परंतु माझा नातू वाचला पाहिजे यासाठी घरकुल मिळण्याची मागणी चंद्रकलाबाई करते आहे. त्यामुळे जबाबदार यंत्रणांनी या गंभीर वास्तवाकडे लक्ष देऊन चंद्रकलाबाई ला स्वतःचे घर मिळाले पाहिजे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com