शेतकऱ्यांसाठी १७ पासून राज्यभरात एल्गार : खा. राजू शेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांसाठी १७ पासून राज्यभरात एल्गार; खा. राजू शेट्टी

शेतकऱ्यांसाठी १७ पासून राज्यभरात एल्गार; खा. राजू शेट्टी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिखली (जि. बुलडाणा) : काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना पीक विम्याचे दावे मंजूर होण्यास होत असलेला विलंब तसेच कापसासह सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा १७ नोव्हेंबरपासून नागपूरातून एल्गार पुकारणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दिले.

बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी ते आले होते. त्यांनी चिखली येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, देशातील शेतकरी भिकेला लागला असून केंद्र सरकारने परदेशातून सोयाबीन पेंड आयात केल्यामुळे शेतकऱ्यांचे खच्चीकरण झाले. मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे त्यामध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज आहे.

हेही वाचा: लसीकरणासाठी टिमवर्क म्हणून काम करा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

केंद्र सरकारने गुजरात सरकारला १००० कोटींची मदत केली. परंतु त्यापेक्षा मोठे संकट महाराष्ट्रात आल्यावरदेखील भरीव मदत करण्यात आली नाही. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती कोषात हजारो कोटी रुपये साचलेले असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे केंद्राने दुर्लक्ष केले. राज्याला केलेली मदत तोकडी असून अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी करण्याचेही औचित्य मंत्र्यांना दाखवता आले नाही.

पीकविमा कंपन्यांनीसुद्धा शेतकऱ्यांवर दरोडाच टाकला असून, हे सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्या उच्चपदस्थांनी या दरोड्याला साथ दिली, असा प्रश्नही शेट्टी यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक वाढत असून ११ हजार रुपये सोयाबीन असताना सोयाबीन व सोयाबीन पेंड आयात करायची गरज नव्हती. यातून तुम्ही काय साध्य केले, असा सवाल खासदार शेट्टी यांनी केंद्र सरकारला केला.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व संघटनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: कऱ्हाड : स्वच्छ सर्वेक्षणातील घसरणीवर चर्चेची गरज

या आहे प्रमुख मागण्या

परदेशातून होणारी सोयाबीन पेंडची आयात रद्द करत सोयाबीनवरील जीएसटी टॅक्स वसूल करणे बंद करण्यात यावे, विमा कंपन्यांनी कराराप्रमाणे २५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट विमा परतावा द्यावा अशा मागण्या राजू शेट्टी यांनी यावेळी केल्या आहे.

असे होणार आंदोलन

मागण्यांसाठी १७ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा खा. शेट्टी यांनी केली. १७ नोव्हेंबरला रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन, १८ नोव्हेंबरला गावागावात चावडीवर धरणे आंदोलन, १९ नोव्हेंबरला राज्यव्यापी रास्तारोको, २० नोव्हेंबरला गावबंद आंदोलन करण्यात येणार असून सरकारने प्रतिसाद दिला नाही तर २१ नोव्हेंबरपासून रस्त्यावर उतरून कायदा हातात घेण्याची गरज पडली तरी मागे हटणार असेही राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

loading image
go to top