Farmer : शेतकऱ्यांनी मांडल्या कृषी उपसंचालकांकडे समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Farmer : शेतकऱ्यांनी मांडल्या कृषी उपसंचालकांकडे समस्या

बाळापूर : कपाशी उत्पादक कंपन्यांकडून ४५० ग्रॅम पाकिटात बियाणे उपलब्ध करून दिले जाते, त्यामुळे पॅकींगचा खर्च वाढतो आणि शेतकऱ्यांना देखील पॅकींग खर्चासह किंमत लावली जाते. परिणामी एक एकर करिता बियाणे पॕकींग असावे, राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे शेतरस्त्यावर संपादित जमिनीचा मोबदला मिळावा, अशा प्रकारच्या विविध समस्या वजा मागण्या शेतकऱ्यांनी संवाद कार्यक्रमात केल्या.

तालुक्यातील मालवाडा येथे ‘माझा एक दिवस बळीराजा’साठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या कृषी उपसंचालक पांडुरंग शिगेदार यांच्यासमोर मांडल्या.

अतिसधन कापूस लागवडीचे प्रणेते प्रयोगशील शेतकरी दिलीप ठाकरे, तालुका कृषी अधिकारी एन. डी. माने, मंडळ कृषी अधिकारी एस.डी. जाधव, कृषी सहाय्यक व्ही आर वसतकर यांची यावेळी उपस्थिती होती. पीक विमा कंपनीकडून मंडळनिहाय पावसाची नोंद घेतली जाते. त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. सध्याचा पाऊस असमान पडतो, त्यामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर देखील त्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागते. परिणामी रेन गेजची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात आली. जिल्ह्यातील काही गावांमध्ये बॅरेजची उभारणी झाली आहे.

त्यात पाणी साठवण्यात आले असताना त्याचा कोणताही उपयोग होत नाही. हे पाणी शेतीसाठी उपलब्ध करावे. जिल्हा बँकेकडून देण्यात येणाऱ्या पीक कर्ज विषयक अडचणी, सेवा सोसायटीकडून कपात होणाऱ्या शेअर्सचा परतावा, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या. समस्यांची नोंद घेत, तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची आश्वासन यावेळी पांडुरंग शिगेदार यांनी दिले. शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात कापसातील अनावश्यक कचरा कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्यावे. गुटख्याचे पाऊच? कापूस वेचणाऱ्यांचे केस, पोत्याचे तंतू, असे अनावश्यक घटक कापसात गेल्यास प्रक्रियेत अडचणी येतात, अशा कापसाच्या गाठी जागतिकस्तरावर देखील नाकारल्या जातात, त्यामुळे शेतकऱ्यांनी वेचनीत दक्षता बाळगावी, असे आवाहन दिलीप ठाकरे यांनी यावेळी केले. कापसाची उत्पादकता वाढावी याकरिता शेतकऱ्यांनी अतिसघन कापूस लागवडीवर भर द्यावा, असा सल्ला पांडुरंग शिगेदार यांनी दिला. तालुका कृषी अधिकारी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.