
शेतकऱ्याने साधली अर्थक्रांती; शेतीतून साडे सोळा लाखांचे उत्पन्न
नांदुरा (जि. खामगाव) : तालुक्यातील कंडारी येथील शिवाजी तेजराव भाकरे या युवा शेतकऱ्याने नऊ एकर बागायती क्षेत्रातून २०२० मध्ये वेगवेगळ्या पिकाची पेरणी करीत योग्य नियोजनातून तब्बल साडेसोळा लाखांचा नफा कमवून अर्थक्रांती साधली आहे. त्यांनी मिरची, वांगे, सोयाबीन, तूर, कापूस व भुईमूग या पिकांना प्राधान्य देत रेकॉर्डब्रेक उत्पादन घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीद्वारे आशेचा किरण दाखवून दिला आहे. (Farmers-News-Income-of-sixteen-lakhs-Different-crops-grown-Khamgaon-District-News-nad86)
नांदुरा तालुका तसा अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणारा आहे. सिंचन सुविधेपासून कोसोदूर असल्याने बेभरवशाची शेती हा शाप या तालुक्याला आहे. तसेच कोरडवाहू शेतीतून उत्पादन खर्चाच्या मानाने उत्पन्न कमी होते. तालुक्यात सद्यःस्थितीत कंडारी व लोणवाडी लघू सिंचन प्रकल्प वगळले तर सिंचनाच्या कोणत्याच सुविधा नाहीत. त्यातही सध्या कंडारी लघू सिंचन प्रकल्पाचा लाभ हा ठराविक परिसरातील शेतकऱ्यांना होत असून, तेथील शेतकरी योग्य नियोजनातून रेकॉर्डब्रेक उत्पन्न घेत असल्याचे दिसून येते.
कंडारी येथील शिवाजी तेजराव भाकरे या युवा शेतकऱ्याने सन २०२० च्या खरीप हंगामात एक एकर क्षेत्रात ५ हजार मिरचीची रोपे पेरून सेंद्रीय खतांचे नियोजन करीत तब्बल ३५० क्विंटल उत्पादन घेतले आहे. सरासरी या मिरचीला २० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने दहा लाखाचे उत्पादन मिळाले. त्यासाठी उत्पादन खर्च ३ लाख आला असून, शुद्ध नफा ७ लाख मिळाला आहे.
तसेच २० गुंठे क्षेत्रात अडीच हजार वांग्याच्या रोपातून ५ लाखाचे उत्पादन घेतले आहे. त्यासाठी त्यांना उत्पादन खर्च दीड लाख रुपये आला असून, शुद्ध नफा साडे तीन लाख रुपये झाला. तर सोयाबीन-तूर सरी वरंबा पद्धतीतून त्यांनी सोयाबीन हाताने पेरून हेक्टरी ३० क्विंटल तर तुरीतून २८ क्विंटल हेक्टरी उत्पादन घेत आदर्श निर्माण केला आहे. सुयोग्य नियाेजन, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका वर्षात नऊ एकर शेतीतून साडे सोळा लाखाचा शुद्ध नफा घेऊन त्यांनी ही अर्थक्रांती साधली आहे.
नऊ एकर बागायती क्षेत्रात मागील वर्षी वेगवेगळ्या पिकातून २२ लाख ७५ हजारांचे उत्पादन काढले. यामध्ये सर्व खर्च काढून साडेसात लाख रुपये नफा मिळाला आहे. शेतीला सिंचनाची जोड असल्यानेच ही किमया साधली जाऊ शकते. यावर्षी पण योग्य नियोजनातून पीक घेण्यावर भर दिला आहे.- शिवाजी भाकरे, शेतकरी, कंडारी
(Farmers-News-Income-of-sixteen-lakhs-Different-crops-grown-Khamgaon-District-News-nad86)