esakal | पानमळे मोजताहेत शेवटची घटका; लघुउद्योगाचा दर्जा देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers who produce leaves from Nagveli are in trouble.jpg

पुरातन काळापासून महत्त्व असलेल्या नागवेलींच्या पानाचे मळे आजघडीला सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजतायेत. संग्रामपूर तालुक्यात दशकापूर्वी पानाचे शेकडो मळे अस्तित्वात होते. पण वातावरणात बदल झाला.

पानमळे मोजताहेत शेवटची घटका; लघुउद्योगाचा दर्जा देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टुनकी (बुलडाणा)  : कमी होत चाललेला पाणीसाठा, पीकविमा योजनेचे नसलेले कवच आणि वातावरणात सतत बदल होत असल्याने नागवेलींपासून पानांचे उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पानमळ्याला लघुउद्योगाचा दर्जा देण्याची मागणी उत्पादक शेतकरी करीत आहेत.

पुरातन काळापासून महत्त्व असलेल्या नागवेलींच्या पानाचे मळे आजघडीला सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजतायेत. संग्रामपूर तालुक्यात दशकापूर्वी पानाचे शेकडो मळे अस्तित्वात होते. पण वातावरणात बदल झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. गारपिटीचा फटका बसू लागला आणि अशा परिस्थितीत सरकार आणि प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आजघडीला तालुक्यात बोटावर मोजण्याइतके पानमळे शिल्लक राहिले आहेत. 

नागवेलीच्या पानाचा मळा उभा करण्यासाठी अथक कष्ट घ्यावे लागतात. वेलींची लागवड करण्याआधी उंच वाढणाऱ्या शेवगा झाडाची लागवड करावी लागते. नंतर पानाच्या वेली लावाव्या लागतात. नंतर नागवेल या झाडांवर चढवली जाते. कमी पाण्यात वेली वाढण्यासाठी ठिंबक सिंचनाचा वापर हमखास करावा लागतो. तारेच्या कंपाऊंड बरोबरच पानवेलींना वादळाचा फटका बसू नये म्हणून जाळ्या देखील लावाव्या लागतात. 

अगदी पहिले उत्पन्न हातात येईपर्यंत लाखोंचा खर्च होतो. पण गारपीट, वादळीवारा, दुष्काळ, अतिवृष्टी आणि आणखी काही कारणांनी मळ्याला धोका पोहचला की शेतकरी अडचणीत सापडतो. कारण लाखमोलाचं महत्त्व असलेल्या पानमळ्यांना कोणत्याही प्रकारचं विमा संरक्षण नाही. शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही या शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही दुर्लक्षित आहे. पण राज्य सरकारचा महसूल विभाग या पानमळा उत्पादक शेतकऱ्यांकडून सक्तीने करवसुली करतो.
 
पानमळयांची संख्या कमी झाल्याने साहजिकच त्याचा परिणाम एकूण उत्पादनाबरोबरच पान टपरी चालकांच्या व्यवसायावरदेखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. पानमळ्याला लघुउद्योगाचा दर्जा देऊन लागवडीवर अनुदान उपलब्ध केल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित होऊन पान मळ्याच्या लावगडीत वाढ होईल. 

दशकापूर्वी संग्रामपूर तालुक्यात पानमळ्याची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र मशागतीचा खर्च, अपुरी सिंचन सुविधा याअभावी खर्चाएवढे उत्पादन निघणे कठीण होते. म्हणून शेतकरी लावगड करीत नाहीत. शिवाय विम्याचे कवच नाही. रेशीम उद्योगाप्रमाणे पानमळ्याला लघुउद्योगाचा दर्जा दिला; तर निश्‍चितच लावगडीत वाढ होणार आहे. 
- प्रमोद हागे, पान उत्पादक शेतकरी, सोगोडा, संग्रामपूर.  

loading image