esakal | दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत शेतकऱ्यांचे पांढरे सोने घरात!
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton

कापसाच्या शेतीने सद्या पांढरा शालू नेसला असून जवळपास कैऱ्या फुटल्याने अर्ध्यापेक्षा जास्त कापूस पहिल्याच वेच्यात घरात येत आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत शेतकऱ्यांचे पांढरे सोने घरात!

sakal_logo
By
विरेंद्रसिंग राजपूत

नांदुरा (बुलडाणा) : सध्या खरीप हंगाम जमा करण्याची लगीनघाई सुरू असून सर्वच हंगाम एकत्र आल्याने मजुरांची टंचाई भासत आहे. जवळपास हंगाम तोंडावर व हवामान खात्याने पावसाचे संकेत असल्याने माल जमा करण्याची शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली असून मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत.

कापसाच्या शेतीने सद्या पांढरा शालू नेसला असून जवळपास कैऱ्या फुटल्याने अर्ध्यापेक्षा जास्त कापूस पहिल्याच वेच्यात घरात येत आहे. त्यामुळे दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्ताला मिळणारा थोडाफार कापूस आता पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात घरात येऊन पडत आहे. दिवाळीपर्यंत संपूर्ण पिकच शेतकऱ्यांच्या घरात यावर्षी येऊन पडणार, असे सध्या तरी संकेत मिळत आहे.

यावर्षी पावसाचे आगमन वेळेवर म्हणजे मृगातच झाल्याने पीकं बहारदार आली आहेत. सोबतच अधिक मास आल्याने दसरा व दिवाळी लांबल्याने खरीप हंगामातील पिके घरात आल्यागत जमा आहेत. असे असताना सध्या हवामान खात्याने पावसाचे संकेत देत दोन-चार दिवसांत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सोयाबीन, मका सोगणीसोबतच काढणीला शेतकरी प्राधान्य देत असून कापूस वेचणीसाठीही दूर-दूरवरून मजूर आणून कापूस जमा केल्या जात आहे.

हे ही वाचा : दुर्मिळ पान पिंपरी, पानमळा नष्ट होण्याच्या मार्गावर! 

सर्व हंगामाच एकत्र आल्याने मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे मजुरीचे दर वाढले असून सोयाबीन एकरी २५०० रुपये, मका एकरी चार ते पाच हजार रुपये तर कापूस वेचाई प्रति किलो सहा तर सात रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मजुरी देता कंबरडे मोडले जात आहे. दरवर्षी जवळपास दसऱ्यापासून सुरू होणारा कापूस यावर्षी दसऱ्याला घरात येतो की काय अशी परिस्थिती सध्या असल्याने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात कापूस उपलब्ध असणार आहे.

कापसाच्या दरात घसरण

सध्या कापूस मोठ्या प्रमाणात जमा होत असताना कापसाचे अनेक जीन अजून सुरू न झाल्याने व कापसातील आर्द्रतेचे कारण समोर करून खाजगी व्यापारी फक्त चार हजार रुपये प्रति क्विंटलने कापसाची खरेदी करत आहेत. अनेक जीन हे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कापूस खरेदीचा श्री गणेशा करणार तोपर्यंत तरी भावात तेजी येणे शक्य नसल्याचे कापूस जाणकार सांगत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले