esakal | अतिवृष्टीने शेतकरी हताश; तरीही पैसेवारी ५९ पैसे!
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

अतिवृष्टीने शेतकरी हताश; तरीही पैसेवारी ५९ पैसे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात यावर्षी झालेला ढगफुटी सदृष्य पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यातच खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी गुरुवारी (ता. ३०) सरासरी ५९ पैसे जाहीर करण्यात आली. खरीपातील लागवडी योग्य ९९० गावांचा यात समावेश आहे. यंदा पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर आहे. त्यातच जिल्हा प्रशासनाने सन् २०२१-२१ वर्षासाठीची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक जाहीर केल्यामुळे तूर्तास तरी जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम असल्याची मोहर पैसेवारीने लागली आहे.

हेही वाचा: अकोला : पावसाचा जोर कायम, खरीप पिके संकटात

खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करत असतो. या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशांच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. हीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून रूढ झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर होते. यानंतर डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. ५० टक्क्याच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. जिल्ह्यात १०१२ गावे असून, त्यातील ९९० गावे खरीप पिकांची लागवडी योग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील अंतिम पैसेवारी सरासरी ५९ पैसे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

दीड लाख हेक्टरवरील क्षेत्राची हानी

जिल्ह्यात यंदा आतापर्यंत प्रशासनाच्या लेखी अतिवृष्टी-ढगफुटी सदृश पावसामुळे १ लाख ४२ हजार ७६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे ९ हजार ३८.०७ हेक्टर वरील शेत जमीन खरडून गेली. हे नुकसान २१ ते २४ जुलै आणि ६ ते ९ सप्टेंबर या दोन टप्प्यातील अतिवृष्टीमुळे झाले आहे. असे असल्यानंतर सुद्धा जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक जाहीर करण्यात आल्यामुळे अतिवृष्टीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानीसह सुलतानी संकट सुद्धा असल्याचे दिसून येत आहे.

अंतिम पैसेवारी लावणार दुष्काळाची मोहोर

खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी सरासरी ५९ पैसे जाहीर करण्यात आली असली तरी ३१ ऑक्टोबर रोजी प्रशासन सुधारित पैसेवारी जाहीर करेल, तर ३१ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येईल. त्यानंतरच जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीवर शासन व प्रशासन मोहोर लावेल. परंतु असे असले तरी सततची अतिवृष्टी, नदी व नाल्यांच्या पुरामुळे खरडून गेलेली शेतजमीन आणि अतिपावसामुळे पिकांची झालेली हानी यामुळे सध्या जिल्ह्यात ओला दुष्काळ असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय खरीप पिकांची पैसेवारी

तालुका गावे पैसेवारी

  • अकोला १८१ ५५

  • अकोट १८५ ६४

  • तेल्हारा १०६ ५६

  • बाळापूर १०३ ६४

  • पातूर ९४ ५८

  • मूर्तिजापूर १६४ ५६

  • बार्शीटाकळी १५७ ५८

  • एकूण ९९० ५९

loading image
go to top