सामाजिक प्रतिष्ठानची पावती बनवून त्याने केली ही करामत अन् बसला धक्काच!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

अकोटफैलातील हाजी नगर येथील रहिवासी तथा अंजुमन मुफीदुल मुसलमीन ट्रस्टचे सरचिटणीस सय्यद सोहेल अहमद सय्यद युनूस यांनी रामदासपेठ पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, 1998 मध्ये दारुलकाजा (शरिया कोर्ट) आणि बैतुलमल यांच्यामार्फत अंजुमन मुफीदुल मुसलमीन ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती.

अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजुमन मुफीदुल मुसलीमीन ट्रस्टद्वारा संचालित असलेल्या दारुलकजा आणि बैतुलमाल या सामाजिक कार्य करणाऱ्या प्रतिष्ठानचे बनावट पावती पुस्तक तयार करून त्याद्वारे लाखो रुपयांची देणगी मुफ्ती मोहम्मद अशफाक कासमी यांनी हडपल्याची तक्रार रामदासपेठ पोलिस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून मुफ्ती मोहम्मद अशफाक कासमी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अकोटफैलातील हाजी नगर येथील रहिवासी तथा अंजुमन मुफीदुल मुसलमीन ट्रस्टचे सरचिटणीस सय्यद सोहेल अहमद सय्यद युनूस यांनी रामदासपेठ पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, 1998 मध्ये दारुलकाजा (शरिया कोर्ट) आणि बैतुलमल यांच्यामार्फत अंजुमन मुफीदुल मुसलमीन ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. मुस्लीम बांधवांमध्ये उद्भवणारे वाद या संस्थद्वारे मिटवण्यात येत होते. यासोबतच त्यांना न्याय देणे आणि आर्थिक अडचणीत आलेल्या मुस्लिमांना मदती करण्यात येत होती. ही मदत करण्यासाठी मुस्लीम समाजातील मोठ्या हस्ती असलेल्यांकडून देणगी घेण्यासही सुरुवात करण्यात आली होती. 

महत्त्वाची बातमी - ‘तू मला आवडतेस’ असे म्हणत शेतमालकानेच केला कामावर असणाऱ्या महिलेचा...

मोमीनपुरा परिसरातील मशिद-मोमीनपुरा येथे ट्रस्टचे कार्यालय असून, ट्रस्टतर्फे मुफ्ती अशफाक कसमी यांना ‘काझी’ पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्या बदल्यात त्यांना मासिक वेतनही देण्यात येत असून, संस्थेची सर्व दस्तऐेवज त्यांच्याकडे ठेवण्यात आली होती. जे ट्रस्टला आर्थिक मदत करतात त्यांना ट्रस्टच्या अध्यक्षांनी सही केलेली पावतीही दिली जाते. या पावतीवर देणगीदाराचीही स्वाक्षरी असते. 

दरम्यान लॉकडाऊनच्या काळात रमजान सणावेळी मुफ्ती मोहम्मद अशफाक यांनी ट्रस्टच्या कार्यालयात देणगीदारांकडून मोठ्या प्रमाणात देणगी जमा केली. परंतु, देणगीदाराला ट्रस्टच्या पावती ऐवजी बनावट पावती दिल्याचा आरोप ट्रस्टचे सरचिटणीस सय्यद सोहेल अहमद सय्यद युनूस यांनी तक्रारीद्वारे केला. त्यानुसार रामदासपेठ पोलिसांनी मुफ्ती अशफाक कासमीविरुद्ध फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणात मुफ्ती अशफाक कासमी यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud by making a receipt for a social establishment in akola district