
पेनटाकळी धरणाच्या मुख्य कालव्याची घाटनांद्रा, बोथा, वरवंड या शिवारातील वितरण व्यवस्थेची कामे अजून सुद्धा अर्धवट व अपूर्ण आहे.
हिवरा आश्रम (बुलडाणा) : पेनटाकळी धरणाचा मुख्य कालव्याचा पूर्णत्व अहवालाची अजून मंजूरी बाकी असल्यामुळे कालवा दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची माहिती उपविभागीय अभियंता एस. बी. चौगुले यांनी दैनिक सकाळशी बोलताना दिली. काही ठिकाणी कालव्याची वितरण व्यवस्थेची कामे अर्धवट व अपूर्ण असल्यामुळे कालव्याच्या हस्तांतर प्रक्रियेत अनेक अडचणी येत असल्यामुळे कालवा व्यवस्थापन करताना अडचणी येत असल्याचेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
हे ही वाचा : मुलाने केली पित्याची हत्या ; चिंचखेड खुर्द येथील घटना
पेनटाकळी धरणाचा मुख्य कालवा हा दुधा, रायपूर, पाचला, सोनार गव्हाण, सावत्रा, जानेफळ, मिस्कीनवाडी, मारोतीपेठ, गोमेधर, उटी, देळप, पार्डी, घाटनांद्रा, वरवंड, बोथा, बारडा, लोणी काळे असा आहे. पेनटाकळी धरणाच्या मुख्य कालव्याची घाटनांद्रा, बोथा, वरवंड या शिवारातील वितरण व्यवस्थेची कामे अजून सुद्धा अर्धवट व अपूर्ण आहे. या ठिकाणी वितरण व्यवथेची कामे अर्धवट व अपूर्ण असल्यामुळे पूर्णत्व अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी पाठविता येत नाही. जोपर्यंत कालव्याचा पूर्णत्व अहवाल शासनाकडून मंजूर होत नाही. तोपर्यंत कालव्याचे हस्तांतर करता येत नाही. कालव्याच्या हस्तांतरणाअभावी कालवा दुरुस्तीसाठी निधी खर्च करता येत नाही.
हे ही वाचा : करडी परिसरातील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे ; तीस गुंठ्यामध्ये 10 विविध वाणाचा प्रयोग
पेनटाकळी धरणाचा 11 किलोमीटरच्या कालव्यात अनेक झाडे, झुडपे असून कालव्याला अनेक ठिकाणी झाडाच्या मुळ्या जाऊन कालव्याला पाझर फुटले आहे. कालव्यातून पाणी पाझरत असून यामुळे कालव्या शेजारी शेतीचे नुकसान होते. या नादुरुस्त कालव्यातून समारे पाणी जात नसल्यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण होत आहे. कालव्याची कामे पूर्ण झाल्यास बांधकाम पाटबंधारे विभागाकडून कालवा व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरित करता येतो. पेनटाकळी धरणाच्या मुख्य कालव्याचे सिंचन क्षेत्र 682 हेक्टर आहे, तर शाखा कालव्याचे सिंचन क्षेत्र 3 हजार 893 इतके आहे. पेनटाकळी मुख्य कालव्यातून गतवर्षी 12 दलघमी इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. गतवर्षी रब्बीच्या पिकांसाठी 88 हेक्टर पाण्याचा उपसा झाला होता.
सिंचनासाठी पी.डी. एन. पर्याय
कालव्यातून पाणी सोडले तर पुढे पाणी प्रवाहित होत नाही. कालव्यातून पाणी पाझरल्यामुळे शेतीचे नुकसान होते. कालव्यातून पाइप डिस्ट्रिब्युशन नेटवर्क केल्यास कालव्यातून सहज समोर पाणी प्रवाहित होईल व इतर शेतकर्यांच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल.
रब्बीच्या पिकाला कालवा दुरुस्ती करुन लवकरात लवकर पाणी सोडण्यात येईल. कालव्यातून होणार्या पाझराबाबत योग्य ती उपाय योजना करण्यात येईल. त्याप्रमाणे भविष्यात पाइपलाइनव्दारे पाणी नेण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन आहे.
- ए.एन.पाटील, सहाय्यक अभियंता- पेनटाकळी प्रकल्प.
संपादन - सुस्मिता वडतिले