गोंदिया : अखेर ‘तो’ बिबट अडकला वनविभागाच्या पिंजऱ्यात

लोकांनी लगेच घराचे दरवाजे बंद करून घरात बिबट शिरल्याची माहीती वनविभागाला दिली
bibtya
bibtyasakal

गोंदिया: गेली दोन दिवस बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या बोंडगावदेवीवासींना अखेर सुटकेचा श्वास घेता आला. सोमवार, २३ मे रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास बिबट वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर बिबट्याला दूरवरच्या जंगलात सोडण्यात आले.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथे दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. रविवार, २२ मे रोजी बिबट्याने पहाटे यादोराव नारायण बोरकर यांच्या गोठ्यातील बकरीची शिकार केली. २४ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अनेकांना हा बिबट दिसला. लोकांनी ‘बिबट आला’ची हाक लावताच शेकडो लोक बिबट्याला पाहायला गेले. बघ्यांची गर्दी दिसताच बिबट्याने कुंडलिक बोरकर यांच्या घराशेजारील शेतातील आंब्याच्या झाडावर आपले बस्तान मांडले. बिबट झाडावर चढला ही माहिती गावात पोहोचताच मोठ्या संख्येने गावकरी घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणी एकच गदारोळ झाल्याने बिबट्याने झाडावरून उडी मारुन जवळच असलेल्या नामदेव बोरकर यांच्या घरात प्रवेश केला व तिथेच ठाण मांडले.

बिबट झाडावर आहे म्हणून नामदेव बोरकर यांच्या घरातील मंडळी बिबट्याला पाहण्यासाठी बाहेरच असल्याने मोठा अनर्थ टळला. जमलेल्या लोकांनी लगेच घराचे दरवाजे बंद करून घरात बिबट शिरल्याची माहीती वनविभागाला दिली. क्षेत्रसहायक वासुदेव वेलतुरे, वनरक्षक राऊत, दिलीप मुनेश्वर घटनास्थळी दाखल झाले. या कर्मचाऱ्यांनी लगेच आपल्या रेस्क्यू टिमला कळविले. सात वाजताच्या दरम्यान वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली.

त्यांनी घराच्या मागील दरवाज्याला पिंजरा लावला. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नाने रात्री सव्वादहा वाजता बिबट्या पिंजऱ्यात अडकला. लगेच बिबट्याला जंगलात सोडण्यात आले आणि गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com